- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकीकडे भाजप बॅकफुटवर गेल्याचे चित्र असतानाच मिनीमंत्रालयात सत्ता काबीज करण्याचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून दगा फटका टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य सहलीवर जाणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, काँग्रसेचे सदस्यतर तीन जानेवारी रोजीच सहलीवर रवाना झाले असून दोन दिवसात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचेही सदस्य सहलीवर जाणार असल्याचे महाविकास आघाडीतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने स्पष्ट केल आहे.त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आठ जानेवारी रोजी होणारी निवडणूकही रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुळात २३ सदस्य संख्या असलेल्या भाजपचे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजप या निवडणुकीत आताच बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे मनोबल उंचावले आहे. एकूण ६० सदस्य संख्या बुलडाणा जिल्हा परिषदेमधील भाजपच्या एका सदस्याने राजीनामा दिल्याने सध्या जिल्हा परिषदेचे ५९ सदस्य आहे. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पुन्हा एकदा बैठक होत असून सभापतीपदे वाटपाचा सहमतीने निर्णय होणार आहे. दरम्यान, दोन जानेवारी रोजी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बांधकाम सभापतीपद सरळ सरळ तीनही पक्ष आपसात वाटून घेणार असल्याचे संकेत असून बाकी पदे ही सदस्य संख्या विचारात घेऊन सोयीनुसार वाटप केल्या जातील, असे सुत्रांनी सांगितले. दोन जानेवारी रोजी रात्री झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्याचा निर्णयावर सहमती झाली असून तशी रणनितीही ठरविण्यात आली आहे. या बैठकीस काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहूल बोंद्रे, प्रदेश प्रतिनिधी श्याम उमाळकर, शिवसेनेतर्फे जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, भोजराज पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी हे उपस्थित होते. दुसरीकडे दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसचे सदस्य हे आताच सहलीवर गेले असून पाच जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचेही सदस्य सहलीवर जाणार असल्याचे वृत्त आहे.तिनही पक्षांना मिळणार प्रत्येकी दोन पद; अध्यक्षपद काँग्रेसच्या पारड्यात?प्रथमत: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बांधकाम सभापती ही तीन महत्त्वाची पदे महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष वाटप करून घेणार असून त्यानंतर उर्वरित तीन सभापतीपदे सोयीनुसार व सदस्यसंख्या विचारात घेऊन घेण्यात येतील. काँग्रेसचे एकुण १४ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे प्रत्येकी नऊ सदस्य आहे. त्यामुळे काँग्रेसकडे जिल्हा परिषद अध्यक्षपद, राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्षपद आणि शिवसेनेकडे बांधकाम सभापतीपद जाणार असल्याची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा आहे.सोमवारी महत्त्वाची बैठकमहाविकास आघाडीच्या तीन्ही घटकपक्षांची सहा जानेवारीला आणखी एक महत्त्वाची बैठक होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त कॅबिनेटमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे जिल्ह्यात आल्यानंतर चर्चिल्या न गेलेल्या काही मुद्द्यावर तिन्ही पक्षांची भुमिका स्पष्ट होईल, असेही सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्याचे पती हे भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान गेले होते. मात्र त्यांची जिल्हा परिषद सदस्य असलेली पत्नी आजही काँग्रेसमधील असल्याचे काँग्रेसच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संख्या बळात फारसा बदल झालेला नाही, अशी पुष्टी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सुत्रांनी दिली.
बुलडाण्यात महाविकास आघाडीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 2:53 PM