लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : तालुक्यातील सोनाटी शिवारामधून ९ डिसेंबरच्या रात्रीला अँल्युमिनियमची जवळपास २0 लाख रुपये किमतीची तार चोरीला गेली होती. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आपली तपास चक्रे फि रुन २१ डिसेंबर रोजी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन वाहनांसह तारांचे बंडल व अन्य साहित्य मिळून सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चारही आरोपींना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोनाटी शिवारामध्ये टॉवरचे काम सुरू आहे. ९ ते दहा डिसेंबर दरम्यान तेथून २0 टन वजनाचे अँल्युमिनियम तारांचे पाच बंडल चोरट्यांनी लंपास केले होते. २0 लाख रुपये त्यांची किंमत होती. जालना येथील जसवंतसिंह रामसिंह यांनी मेहकर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती. मेहकरचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी या प्रकरणात तपास करीत पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आढाव, पोलीस निरीक्षक शरद गिरी, अशोक म्हस्के, उमेश घुगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप बाजड, अनिल काकडे यांच्या चमूला तपास कामी पाठवले होते. तपासात या चमूने आरोपी संतोष ऊर्फ देवराव भीमराव देशमुख (सरकटे) (रा. एकांबा, तालुका मालेगाव ह.मु.आडसावंगी नाशिक), गणेश काकडे (रा. एकांबा ता. मालेगाव, जि. वाशिम), शरद मेहेत्रे (२५ रा.भिवापूर, ता. मेहकर), संदीप हरिशचंद जाधव (२६ रा. सारोळा मांडवा, ता. वाशी , जि. उस्मानाबाद) या आरोपिंना वेगवेगळय़ा ठिकाणावरुन अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.
साहित्य केले जप्त आरोपींकडून पोलिसांनी ट्रक क्रमांक एचआर-५५-९१0६ आणि एमएच-१३-आर-४६८९ ही दोन वाहने जप्त केली आहेत. अनुक्रमे दहा लाख आणि दोन लाख रुपये अशी त्यांची किंमत आहे. अँल्युमिनियमची पॉवर ग्रेडची ३३ एमएम गेजची तार ही चार लाख रुपये किमतीची आहे. असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे.