लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शहर व परिसरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चिखलीकारांकडून स्वयंत्स्फूर्तीने कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. तर दुसरीकडे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे क्वारंटीन कक्षातील तब्बल ४ पॉझीटीव्ह रूग्ण आपल्या परिवारातील सदस्याच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.स्थानिक खैरूल्लाशाह बाबा दर्गाह परिसरातील ४ रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह असल्याने त्यांना अनुराधा इंजिनिअरींग कॉलेजच्या वसतीगृहातील कोवीड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. १२ जुलै रोजी या रुग्णांच्या ६२ वर्षिय नातेवाईकाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीत चारही पॉझीटीव्ह रूग्ण सहभागी झाले होते. कोवीड केअर सेंटरमधील क्वारंटीन असलेले चार पॉझीटीव्ह रूग्ण हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इम्रान खान यांच्या परवानगीने या अंतयात्रेत सहभागी झाल्याचे बोलल्या जात आहे. याबाबत डॉ. खान यांना विचारले असता पॉझीटीव्ह रूग्णांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे ते सांगत आहे. अंतयात्रेत इतरही १५ ते २० नागरीक सहभागी होते. मात्रे ते चार पॉझीटीव्ह रूग्ण हे अनुराधा हॉस्टेलपासून एक आॅटोव्दारे आले होते. ज्या आॅटोरिक्षाव्दारे या रूग्णांनी ये-जा केली तो आॅटोही आरोग्य विभागाने क्वारंटीन सेंटरवर निर्जंतूक केला. प्रशासनाच्या या हलगर्जीामुळे संसर्गाचा धोका वाढला असून या प्रकाराने येथील जनता कर्फ्यूला हरताळ फासण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्वत्र तीव्र रोष व्यक्त होत आहे. हे चार पॉझीटीव्ह रूग्ण अत्यंविधीच्या कार्यक्रमात सहभागी झाले असल्याचा दुजोरा माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक यांनी दिल्याने या प्रकारास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
’त्या’ रूग्णांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नव्हती. क्वारंटीन सेंटरमधील व्यक्ती बाहेर जाऊ न देण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे. आमच्यावर केवळ स्वॅब घेणे व रूग्णांवर उपचार करणे एवढीच जबाबदारी आहे.याबाबत तातडीने पोलिसांत तक्रार केली.-डॉ.इम्रान खानतालुका आरोग्य अधिकारी, चिखली
अशी तक्रार चिखली पोलिस स्टेशनला नाही. ‘त्या’ रूग्णांना आमच्या कर्मचाऱ्यांसमोर त्यांनी सोडलं आणि परत आणले. ने-आण करण्याचे गौडबंगाल त्यांनाच माहीत. आॅटो सॅनेटाईजही त्यांनीच केला. क्वारंटीन सेंटरच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पोलिसांची आहे. रूग्णांना सोडण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत.
-गुलाबराव वाघठाणेदार, चिखली पोलिस स्टेशन