बुलडाणा : आपल्या न्याय, हक्कासाठी स्वातंत्र्यदिनापासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार जणांनी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी या उपोषणकर्त्यांच्या उपोषण मंडपाला कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांनी भेट दिली नसल्याचे चित्र आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या उपोषणकर्त्यांमध्ये मोताळा तालुक्यातील कोथळी येथील विनो भीमराव धुरंदर हे त्यांच्या पत्नीसह १४ ऑगस्टपासून उपोषणास बसले आहेत. त्यांच्या मागण्यांमध्ये लोणघट येथे असलेली त्यांच्या शेतीमधून कुठल्याही प्रकारचा किंवा जुना नोंदी पुराव्यामध्ये रस्ता नाही. रस्ता नसताना या शेतातून अवैध गौणखनिज, वाळूचे ट्रॅक्टर ये-जा करतात. या वाहनांची ये-जा बंद करावी. तर ६ ऑगस्ट रोजी मोताळा मामलतदार यांनी जो आदेश पारित केला, तो परत घ्यावा, तर पूर्वीपासून नकाशावर उपलब्ध असलेला रस्ता मोकळा करून कायमस्वरूपी रस्ता देण्यात यावा, तर धामणगाव देशमुख धरण प्रकल्पाची हद्द कायम करण्यात यावी, या मागण्यांसाठी उपोषणास बसलेले आहेत.
शेतकरीविरोधी कायदे मागे घ्या
५ जून रोजी केंद्र शासनाने पारित केलेले शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनापासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांमध्ये लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केले होते. ते तत्काळ मागे घ्यावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, कोविडकाळात मजुरांच्या विरोधात तयार केलेले संशोधित कायदे रद्द करावे, या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
स्टेट बँकेच्या त्रासाला कंटाळून उपोषण सुरू
भारतीय स्टेट बँकेच्या त्रासाला कंटाळून देऊळगाव राजा येथील युवकाने १४ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सुशिक्षित बेरोजगार निर्मूलन अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्याज परतावा योजनेंतर्गत ज्ञानेश्वर केशव म्हस्के या युवकाने अर्ज केला होता. २०१८ मध्ये अर्ज करूनही त्याला न्याय न मिळाल्यामुळे कंटाळून युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, कोविडचे कारण पुढे करीत अधिकाऱ्यांनी बाजू सांभाळून नेली. तर, भारतीय स्टेट बँकेने केलेली फरफट थांबवावी, यासाठी ज्ञानेश्वर म्हस्के यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
साखरखेर्डा येथील साधन केंद्रातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करा
साखरखेर्डा येथील साधन केंद्र या संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार व कथित कर्मचारी यांची चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी १५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी उपोषण सुरू केले आहे. कार्यकारिणीच्या अध्यक्षा सुनीता रामेश्वर खरात यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयांतर्गत तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यालयांतर्गत सिंदखेडराजा तालुकास्तरीय महिला बचत गटांचे फेडरेशन स्थापन करून रीतसर नोंदणी केली आहे. या संस्थेचा कार्यभार कार्यरत व मान्यताप्राप्त कार्यकारिणी पदाधिकारी यांच्यामार्फत नियमाने होणे आवश्यक असताना २०१४ पासून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध वसंता तायडे रुजू झाल्यापासून कार्यकारिणीला विश्वासात न घेता महिला विकासासाठी माविममार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा मंजूर निधी केंद्राच्या विविध बँक खात्यावर पाठवून आमच्या केंद्रांच्या विविध बँक खात्यावर पाठवून केंद्राच्या व्यतिरिक्त महिला पदाधिकारी दर्शवून लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.