संदीप भोपळे। लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा महासिद्ध: जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी पाऊस आल्याने नदीला पूर आला व विद्यार्थ्यांना चार तास अडकून पडावे लागले.जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध गावाजवळील नदीवर पुलाच्या कामास मंजुरी असतानाही चालढकल केल्यानंतर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संबंधित विभागाने पूल बांधकामाला सुरुवात केली आहे. या पूल बांधकामामुळे पर्यायी रस्ता काढण्यात आलेला आहे. दरम्यान, गुरुवारी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धानोरा गावच्या आसलगाव रस्त्यावर आणि वडगाव गड रस्त्यावरील पर्यायी रस्ता वाहून गेला. यामुळे वडगाव गड, धानोरा महासिद्ध, हनवंतखेड, गारपेठ, रायपूर, राजुरा, हासनपूर, नांगरटी या गावातील शाळेतील लहान मुलावर तसेच परिसरातील जनतेवर ४ तास पूर उतरण्याची वाट पाहण्याची वेळ येऊन नाहक त्रास सहन करावा लागला. एखाद्या रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असताना अशी स्थिती उद्भवली असती तर अनर्थ होऊ शकतो.तर पर्यायी रस्ता वाहून गेल्याने वडगाव गड, धानोरा महासिद्ध, हनवंतखेड, गारपेठ, रायपूर, राजुरा, हासनपूर, नांगरटी आदी आदिवासी गावात ६ जूनपासून बसफेऱ्यासुद्धा बंद झालेल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांना तसेच शाळकरी विद्यार्र्थ्यांना पास असतानाही खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाहतूक सुरळीत होण्याकरिता प्रयत्न करावे अन्यथा या गावातील शाळकरी मुले व परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पुरात ४ तास अडकले विद्यार्थी
By admin | Published: June 30, 2017 12:22 AM