बुलढाणा/ मलकापूर पांग्रा: समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील फर्दापूर टोल नाक्यालगतच्या सुमारे दहा किमीच्या पट्टयात गेल्या २४ तासात झालेल्या तीन अपघातामध्ये चार जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस येथील तिघांचा तर उत्तरप्रदेशमधील एकाचा समावेश आहे. जखमी धुळे जिल्ह्यातील आहेत.
समृद्धीवर चॅनल क्रमांक २८३ वर झालेल्या अपघातामध्ये वाशिम येथून लग्न आटोपून येत असलेल्या लग्नाच्या वऱ्हाडातील तिघेजण लघु शंकेसाठी फर्दापूर टोल नाक्यानजीक थांबले असता भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकने तिघांना वाहनात बसत असताना उडवले. यामध्ये एकाचा घटनास्थळीच तर दोघांचा मेहकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात पहाटे चार वाजेच्या सुमारास घडला. मृतामध्ये विजय शेषराव मान्टे (४८), अेाम मान्टे (२०), तुषार मान्टे (३४) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच फरर्दापूर पोलिस मदत केंद्राचे पीएसआय शैलेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत जखमींना मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.
दुसऱ्या अपघातामध्ये धुळ्यातील पाच जण जखमीदुसरा अपघात हा समृद्धी महामार्गावरच ४ जून रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडला. चॅनल क्रमांक २७४ लगत हा अपघात एमएच-४७-क्यू-७८२८ क्रमांकाच्या वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाला. हे वाहन धुळ्यावरून नागपूरकडे जात होते. हर्षद शिंदे, अविनाश शिंदे आणि अन्य चार जण नागपूरकडे जात होते. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने या वाहनात असलेले धुळे येथील सहा जण जखमी झाले आहेत. यातील अविनाश शिंदे यांना गंभीर इजा झाली आहे. या जखमीवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
तिसऱ्या अपघातात ट्रक चालक ठारतिसरा अपघात हा ३ जून रोजी घडला. या मध्ये यूपी-५०- डीटी-७१८१ क्रमांकाच्या ट्रकने केए-०१-एएच-६०५४ क्रमांकाच्या कंटेनरला मागिल बाजूने धडक दिली. या अपघातामध्ये उत्तर प्रदेशातील आझमगड येथील ट्रक चालक दिनेशुकमार तिवारी याचा ट्रकच्या कॅबिनमध्येच अडकून मृत्यू झाला. त्याला वाहन चालवितांना डुलकी लागल्याने मागील बाजूने समोरील कंटेनरवर त्याचा ट्रक धडकून रस्त्यालगत क्रॅश बॅरियर तोडून वाहन ३० फुट खोल खाली पडले.
मोठा अनर्थ टळलापहाटे चार वाजेच्या सुमारास फर्दापूर टोल नाक्यानजीक झालेल्या अपघातादरम्यान लग्नाच्या वऱ्हाडातील चार ते पाच वाहने एकामागे एक थांबली होती. अपघातामध्ये मृत पावलेले तिघेजण एमएच-२८-एझेड-७५४६ क्रमांकाच्या वाहनात बसत असतानाच अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रकने तिघांना उडविले. यावेळी थोडेजरी नियंत्रण हुकले असते तर येथे मोठी जिवित हानी होण्याची शक्यता होती.