ब्रह्मनंद जाधव / बुलडाणा दुष्काळी परिस्थितीमुळे उन्हाळ्याच्या सुट्टीतही जिल्ह्यात शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला आहे. दुष्काळी भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सुमारे १३ लाख ८३ हजार ४७१ विद्यार्थ्यांची उन्हाळ्याच्या सुट्टीत भूक भागविण्यात आली आहे. शालेय पोषण आहारासाठी जवळपास २२ लाख ९९ हजार ७0२ रुपये खर्च करण्यात आला आहे.जिल्हा परिषद प्राथमिक, पूर्व माध्यमिक आणि टंचाईग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवविणे बंधनकारक असल्याचा आदेश जिल्हा परिषेदच्या शिक्षणविभागाला देण्यात आला होता. पीक पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असणार्या गावांतील शाळांचा यात समावेश करण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाने जिल्ह्याला होरपळला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील सर्वच गावांतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळ्याचे दीड महिना पोषण आहार शाळेतच देण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील २ हजार ५८५ शाळेत विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात पोषण आहार वाटप करण्यात आला आहे. त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या १ हजार ६३२ शाळा व सहावी ते आठवीपर्यंंतच्या ९५३ शाळांचा समावेश होता. दुष्काळी भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या एकूण १३ लाख ८३ हजार ४७१ विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत पोषण आहार घेतला आहे. त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंंतच्या ९ लाख ४५ हजार ४१६ विद्यार्थ्यांंनी पोषण आहार घेतला असून, त्यासाठी केंद्रहिस्स्या अंतर्गत ८ लाख २0 हजार ९२४ रुपये व राज्य हिस्स्यांतर्गत ५ लाख ४७ हजार ३३0 रुपये, असा एकूण १३ लाख ३२४ रुपये खर्च करण्यात आला आहे. सहावी ते आठवीपर्यंंतच्या ४ लाख ३८ हजार ५५ विद्यार्थ्यांंनी पोषण आहार घेतला असून, त्यासाठी केंद्रहिस्स्या अंतर्गत ५ लाख ६१ हजार ८७ रुपये व राज्य हिस्स्यांतर्गत ३ लाख ७0 हजार २९२ रुपये, असा एकूण ९ लाख ३१ हजार ३७८ रुपये खर्च शालेय पोषण आहारासाठी करण्यात आला आहे.
दुष्काळात भागविली ४ लाख विद्यार्थ्यांची भूक!
By admin | Published: July 06, 2016 2:43 AM