खामगाव: येथील ओंकारेश्वर स्मशानभूमी नजीकच्या एका कृषी केंद्र संचालकाच्या गुदामातील सोयाबीन बियाण्यांच्या चोरी प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी आणखी चार नवीन आरोपींना रविवारी सायंकाळी अटक केली. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मालवाहू गाडीही जप्त करण्यात आली. या गुन्ह्यात आतापर्यंत आठ जनांना अटक करण्यात आली असून, आणखी आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
याबाबत सविस्तर असे की, शहरातील अमृतबाग येथील रहिवासी अंकुर अग्रवाल यांच्या मालकीचे ओंकारेश्वर स्मशानभूमीच्या बाजूला कृषी माल साठविण्याचे गुदाम आहे. या गुदामात १४ ते १५ जूनच्या कालावधीत चोरट्यांनी सात लाख सहा हजार ५० रुपयांचे सोयाबीन बियाणे लंपास झाले होते. यातक्रारीवरून अंकुर अग्रवाल यांनी शिवाजीनगर पोलिसांनी भादंवि कलम ३८०, ४६१ अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
तपासादरम्यान डी.बी. पथक पो.स्टे. शिवाजीनगर, खामगाव यांनी गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत माहिती काढून गुन्ह्यातील अज्ञात चोरटे राहुल ईश्वर चव्हाण (वय २०), विजय रामा मांडवेकर (वय २६), योगेश ज्ञानदेव एंडोले (वय ३३) रा. सुटाळा, खुर्द ता. खामगाव आणि दीपक गजानन (वय २३ वर्षे) रा. खुटपुरी ता. खामगाव यांना गुरूवारी अटक केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शिवाजीनगरचे पोलिस निरिक्षक अरुण परदेशी सपोनि. विलास मुंढे, पोहेकाँ निलसिंग चव्हाण, नापोकाँ देवेंद्र शेळके, नापोकाँ संदीप टाकसाळ, नापोकाँ संतोष वाघ, नापोकाॅ राजु कोल्हे, पोकाँ प्रवीण गायकवाड व पोकाँ देवेंद्र देशमुख पो.स्टे. शिवाजीनगर, खामगाव यांनी केली.
असे आहेत रविवारी अटक केलेले आरोपी
लखन राजू कदम (वय २६), पंकज नारायण पन्हाळकर (वय २९),राजेश ईश्वर ससे (वय २८), सूरज लक्ष्मण गुरव (वय ३२) सर्व राहणार शिवाजी नगर, खामगाव अशी नवीन आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मालवाहू गाडीही जप्त करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी आरोपींच्या संख्येत वाढ होणार असल्याचा दावा पोलीस सुत्रांनी केला आहे.