- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिकच गडद होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर आणि बेड्स वाढविण्यावर आरोग्य विभागाकडून भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात नवीन चार कोविड सेंटर लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या सेंटरमध्ये जवळपास ३६० खाटा उपलब्ध राहणार आहेत. जिल्ह्यात एक वर्षापूर्वी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळून आला हाेता. कोरोनाबाधितांचा आलेख झपाट्याने वाढत चालला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १४.६० टक्क्यावर आहे. तर मृत्यूदरही वाढला आहे. सध्या कोरोनाबाधितांचा मृत्यूदर हा ०.७० टक्क्यावर आला आहे. कोरोनाचा उद्रेक बघता आता आरोग्य विभागाकडूनही सुविधा वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोनाचे लसीकरण वाढविण्याबरोबरच कोविड सेंटरमध्ये खाटा वाढविण्यावरही भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर नव्याने चार कोविड सेंटरही (डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर) वाढविण्यात येत आहेत. बुलडाणा आणि हिवरा आश्रम याठिकाणी कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून नवीन कोविड सेंटरच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. तीन सेंटरमध्ये प्रत्येक १०० आणि एका सेंटरमध्ये ६० अशा एकूण ३६० खाटा राहतील. त्यानंतरही खाटा कमी पडल्या, तर हिवराआश्रम येथे नविन १०० खाटा पुन्हा वाढू शकतात.
या ठिकाणी सेंटर बुलडाणा शहरात तीन सेंटर वाढविण्यात येत आहेत. जिल्हा कारागृह परिसरातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र याठिकाणी १०० खाटा उपलब्ध राहतील. मलकापूर मार्गावरील शासकीय आयटीआयमध्ये १०० आणि क्षयरोग केंद्रात ६० खाटांचे नियोजन आहे. हिवराआश्रम येथील ग्रामीण रुग्णालयात १०० खाटांचे नियोजन आहे.
रुग्णांची वाढती संख्या बघता अतिरिक्त खाटा वाढविण्यात आल्या आहेत. तसेच नवीन कोविड सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. महिला रुग्णालयात सात अतिरिक्त बेडची सुविधा, आयटीआय, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात प्रत्येकी १०० खाटांचे नियोजन आहे. -डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा.