बुलडाणा : चहा तयार करताना स्टोव्हचा अचानक भडका उडून एका विवाहितेच्या कपड्याला आग लागली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पती, सासर्यासह दोन वर्षीय बालीका भाजल्या गेले. ही घटना मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे ३0 जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या चारही जणांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात विवाहितेची प्रकृती गंभीर आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील संतोष सुपडा उबाळे (३३) यांची पत्नी योगिता सकाळी ११ वाजता चहा तयार करीत होती. अचानक स्टोव्हचा भडका उडून तिच्या कपड्यांनी पेट घेतला. दरम्यान, तिच्या किंचाळ्या ऐकून पती संतोष उबाळे, सासरे सुपडा उबाळे (६५) यांनी तिला विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगिता ९८ टक्के जळाली होती. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पती व सासरा यांच्यासह जमिनीवर झोपलेली दोन वर्षीय पुनम संतोष उबाळे ही बालिकाही भाजली गेली. या चारही जणांना उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहिपर्यंत धामणगाव बढे पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे बुलडाण्याचे नायब तहसीलदार पी.पी. सोळंकी यांनी तिचे मृत्यूपूर्वी बयान नोंदविले आहे.
स्टोव्हच्या भडक्याने चार जण भाजले!
By admin | Published: July 01, 2016 12:42 AM