बुलडाणा: कपडे धुण्याच्या कारणावरून दोन सख्या भावांमध्ये झालेल्या भांडणातून एकाचा खून झाल्या प्रकरणी चार जणांना बुलडाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश सी. एम. हंकारे यांनी चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बुलडाणा तालुक्यातील जनुना येथे २०१६ मध्ये ही घटना घडली होती. बुलडाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ३१ आॅगस्ट रोजी हा निकाल दिला. या घटनेत गणेश सुरडकर यांचा खून झाला होता. १२ मे २०१५ रोजी ही घटना घडली होती. त्या दिवशी आरोपी संजय अशोक सुरडकर, मनिषा संजय सुरडकर, बंटी उर्फ महेंद्र भीमराव काकडे आणि मंगला भीमराव काकडे आणि मृतक गणेश व त्याची पत्नी वर्षा यांच्यामध्ये ओट्यावर असलेल्या कपडे धुण्याच्या दगडावरून वाद झाला होता. दरम्यान राग अनावर झाल्याने आरोपी संजय सुरडकर याने गणेश सुरडकर यांच्या पोटात लोखंडी सुरीने सपासप वार केल्याने गणेश सुरडकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना घटनेनंतर जनुना येथून त्वरेने बुलडाणा येथील रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, प्रारंभी भांडणादरम्यान मृतक गणेश सुरडकर याची पत्नी सोडविण्यासाठी गेली असता आरोपी बंटी उर्फ महेंद्र भीमराव काकडे याने वर्षा यांच्या हाताला चावा घेतला तर मंगळा काकडे आणि मनिषा सुरडकर यांनी मिरची पावडर मृतक गणेश त्याची पत्नी वर्षा व सासू शोभाई सिताराम पाखरे यांच्या अंगावर फेकली होती. अशा आशयाची तक्रार १३ मे २०१६ रोजी मृतकाची सासू शोभाई पाखरे यांनी धाड पोलिसांत केली होती. त्या आधारे धाड पोलिसांनी प्रकरणात खूनाच्या गुन्ह्यासह मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा कारणावरून गुन्हे दाखल केले होते. प्रकरणाचा तत्कालीन तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण सोन्ने यांनी तपास करून आरोपींविरोधात बुलडाणा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायालयात प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वादी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी शोभाबाई पाखरे, मृतकाची पत्नी वर्षा सुरडकर या दोघींची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. पंच साक्षीदार उषा रमेश इंगळे, रविंद्र गणेश तोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यकांत लोढे आणि तपासी अधिकारी लक्ष्मण सोन्ने यांचीही साक्ष महत्त्वाची ठरली. या सर्वांच्या साक्षी एकेकांशी सुसंगत अशा होत्या. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील तथा सरकारी अभियोक्ता अॅड. वसंत लक्ष्मण भटकर यांनी वादी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडून युक्तीवाद केला. उभय बाजूंचा युक्तीवाद ऐकूण बुलडाणा न्यायालयाने आरोपींनी संगणमताने हा खूनाचा गुन्हा केल्याच्या कारणावरून आरोपी संजय सुरडकर, मनिषा सुरडकर, बंटी उर्फ महेंद्र काकडे आणि मंगला काकडे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच चारही आरोपींना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा बुलडाणा न्यायालयाने सुनावली. बुलडाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्रीमती सी. एम. हंकारे यांनी हा निकाल दिला. हे प्रकरण चालविण्यासाठी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय गवई, पोलिस कॉन्स्टेबल शेख इमरान यांनी सहकार्य केले.
सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 3:59 PM