मेहकर : शहरातील विविध कंपन्यांच्या विविध भागात लावण्यात आलेल्या टाॅवरची गेल्या तीन वर्षांपासून संबंधित विभागाने थकबाकी न भरल्यामुळे सोमवारी नगर परिषदेने धडक मोहीम राबवून चार टाॅवर सील केले.
मेहकर शहरात विविध भागांमध्ये रिलायन्स, आयडिया तसेच विविध कंपन्यांचे टॉवर विविध भागात लावण्यात आलेले आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून सूचना देऊनसुद्धा संबंधित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेच्या कराचा भरणा न केल्यामुळे मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक सुधीर सारोळकर यांच्या पथकांनी टाॅवर सील केले. शहरातील जुलेखा बेगम खान यांच्या घरावरील टॉवरचे गेल्या तीन वर्षांचे ७६ हजार ६९५, एका वाईन बारच्या जागेतील टाॅवरचे ४५ हजार ६६६, भास्कर काळे यांच्या जागेतील टॉवरचे ७६ हजार ४१८, देशमुख यांच्या घरासमोरील टॉवरचे ७५ हजार ५३० असे एकूण २ लाख ७४ हजार ३०९ थकबाकी हाेती. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने नगर पालिकेच्या पथकाने ही टाॅवर सील केले आहेत. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई कर निरीक्षक सुधीर सारोळकर, शेख शफी अहेमद, विलास दाभाडे, नामदेव सोभागे, विजय कटारे, संजय खोडके, जावेद गवळी, नंदकिशोर आदळे आदींनी केली आहे.