बुलडाणा : ५० हजार रुपये जमा केल्यास प्रत्येक महिन्याला २,६५० ते ३,१२५ रुपये देण्याचे आमिष दाखवून तब्बल २२ जणांची फसवणूक केल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी बंगलाेर येथील रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीच्या दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिदास इंडिया प्रॉपर्टीज कंपनी बंगलोर शाखा औरंगाबाद या कंपनीने दाेन वर्तमानपत्रांमध्ये ५० हजार रुपये सदर कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला २,६५० ते ३,१२५ रुपये नफ्यापोटी परतावा मिळेल, अशी जाहिरात दिली हाेती. तसेच मूळ रक्कम परत पाहिजे असल्यास ४० दिवसात रक्कम परत मिळेल. तसेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रोडटच प्लॉट पाहिजे असल्यास स्वस्त दरात मिळेल, असेही जाहिरातीत म्हटले हाेते. बुलडाणा शहरातील म. साजीद अबुल हसन देशमुख यांनी या कंपनीमध्ये स्वत:चे व नातेवाईकांचे ११ लाख ५० हजार रुपये गुंतविले हाेते. रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीने काही महिने परतावा नियमित दिला. त्यानंतर मात्र परतावा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे माे. साजीद यांनी बुलडाणा शहर पाेलिसात तक्रार दिली हाेती. त्यावरून रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीचे डायरेक्टर आराेपी अयुब हुसेन व अनिस आयमन रा. बंगलाेर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता. बुलडाणा शहर पाेलिसांनी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले हाेते. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे रिदास इंडिया प्राॅपर्टीज कंपनीविराेधात तक्रारी केल्या आहेत. जिल्ह्यातील आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणूक झालेली असल्यास अशा व्यक्तींनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रिदास इंडिया प्रॉपर्टी कंपनी शाखा औरंगाबादच्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन पाेलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक कैलास राहाणे यांनी केले आहे.