खामगाव (बुलढाणा) : खोट्या, बनावट खरेदी खताद्वारे तसेच बनावट मृत्युपत्र तयार करून शेती हडपणाऱ्या सात जणांविरोधात शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खामगावात शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत खामगाव शहरातील सतीफैल भागातील गोपाल वल्लभदास खंडेलवाल यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, खामगाव तालुक्यातील कंझारा शिवारातील गट नं. ३२३ मधील ३ हेक्टर दोन आर शेती त्यांच्या मालकीची आहे. मात्र, आरोपी मो. रईस मो. सईद याने काही जणांशी संगनमत करून संबंधित शेती अहमदाबाद येथील मो. खुर्शीद मो. कासम याच्या नावे मुख्यारपत्राच्या आधारे नोंदवून दिली.
त्यानंतर संबंधित शेतीचे खोटे व बनावट खरेदी खत तयार करून मूळ मृत्यूपत्रावर खोटेनाटे मजकूर तयार करून मृत्युपत्राची नोंद अकोला महानगर पालिकेत केली. यावर अब्दुल रहेमान अब्दुल सत्तार, मुनवरअली सैफुद्दीन बाबजी दोघेही रा. खामगाव, शेख सलीम शेख फिरोजोद्दीन रा. सजनपुरी, सुनील कदम, विजय सूरजवानी दोघेही रा. खामगाव यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्याचे तक्रारीत नमूद केले. तत्पूर्वी फसवणूक झाल्याचे समजताच तक्रारदार गोपाल खंडेलवाल यांनी आरोपी विरोधात खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात प्रकरण दाखल केले. या प्रकरणावरून खामगाव येथील प्रथमवर्ग न्यायाधीश कोर्ट नं. १ यांनी दिलेल्या आदेशावरून सातही आरोपी विरोधात कलम १५६(३) सी. आर. पी.सी. नुसार कलम ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६६, ४७१, ४७४, सह कलम ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सातही आरोपी फरार झाले आहेत. आरोपींचा शोध शहर पोलिस घेत आहेत.