खामगाव : भूखंडाचे मालक नसतानाही भूखंड खरेदीचा सौदा करून अडीच लाखाने फसवणूक केल्याप्रकरणी येथील दोघांविरुद्ध शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, दिवाळीपूर्वीही याच घटनेत सहभाग असलेल्या दोन्ही आरोपींवर शेगाव शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे येथे उल्लेखनीय.
याबाबत स्थानिक जलालपुरा येथील जय देवेंद्र वस्तानी यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, लक्ष्मण विश्वनाथ वराडे (रा. समर्थ नगर) आणि पंकज सीताराम घोरपडे (रा. गजानन कॉलनी, शेगाव) या दोघांनी त्यांच्या मालकीचा भूखंड नसतानाही ताज नगरला लागून असलेले कविश्वर यांच्या ले-आऊटमधील शेत सर्व्हे नं. १४४/ ३ मधील प्लॉट नंबर ४७ क्षेत्रफळ ३०० चौरस मीटरचा व्यवहार १९ नोव्हेंबर २०२२ रोजी केला. हा व्यवहार १० लाख ३२ हजार ९६० रुपयांत झाला होता. या व्यवहाराच्या इसारापोटी २ लाख ५० हजार रुपये दोघांनाही दिले.
दरम्यान, व्यवहारात ठरल्यानुसार भूखंड खरेदी करून देण्याबाबत वस्तानी यांनी वराडे व घोरपडे यांना विचारणा केली. त्यावेळी दोघांनी हा प्लॉट आमच्या नावे नसून तुमचे पैसे परत करण्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे देत फसवणूक केल्याचा आरोप जय वस्तानी यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत केला. या तक्रारीवरून शहर पाेलिसांनी आरोपी लक्ष्मण विश्वनाथ वराडे आणि पंकज घाेरपडे या दोघांविरोधात भादंवि कलम ४०६, ४६७, ४६८, ४७०, ४७१ भादंविचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील करीत आहे.