लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भागीदार असलेल्या दोघांनी एक कोटी सात लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.यशोधरानगरातील रमेश श्रीमंतआप्पा गौरशेट्टे (४४) , मनोज मधुसूदन अग्रवाल आणि निलेश नामदेव इंगळे यांची खामगाव येथे कुलस्वामिनी कॉर्पोरेशन नावाची भागीदारी फर्म आहे. याद्वारे तिन्ही भागीदार फ्लाय अॅश विक्रीचा व्यवसाय करतात. भागीदार असलेल्या मनोज अग्रवाल आणि निलेश इंगळे या दोघांनी संगनमत करून फिर्यादी रमेश गोरशट्टे यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने व्यवसायामध्ये पारदर्शकता न ठेवता तसेच भागीदारी बँक खात्यातून कोणतीही सूचना न देता रक्कमा काढून घेतल्या. तसेच कुलस्वामिनी कॉर्पोरेशनच्या नावे पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रावरून फ्लाय अॅश विकत घेऊन परस्पर विक्री चालू केली. तसेच विकलेल्या मालाची रक्कम फर्मच्या बँक खात्यात जमा न करता परस्पर हडप केली. संशयित आरोपींनी वेळोवेळी भागीदारी फॅर्मचे बनावट लेटरहेड वापरून, त्यावर वेगवेगळ्या सह्या करून फ्लॉय अॅशची उचल केली. भागीदारी बँक खात्याचा गैरवापर केला. कुलस्वामिनी कॉर्पोरेशनच्या नावे हर्रासी पद्धतीने विकत घेतलेल्या ६७०० टन फ्लॉय अॅशची परस्पर विक्री करून एक कोटी सात लाख २० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे रमेश गौरशेट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.या तक्रारीवरून शहर पोलिसांनी संशयित आरोपी मनोज अग्रवाल आणि निलेश इंगळे यांच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ४२०, ४०७, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस तपासात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
चौकशीनंतर आरोपी पसार! फसवणूक प्रकरणातील संशयित भागीदार अग्रवाल आणि इंगळे यांना गुरुवारी सकाळी शहर पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले होते. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी चालली. चौकशीअंती पोलिसांनी संशयित आरोपींना सोडल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी या संशयित आरोपींना ‘सहारा’ दिल्याचीही जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे.