लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : दुचाकीचा फोटो फेसबुक या सोशल माध्यमावर टाकून ती विकायची असल्याचे सांगून वेळोवेळी पैशाची मागणी करीत चिखली येथील एका युवकाला ८५ हजार ५०० रूपयांचा गंडा घातल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेने सोशल मिडीया अथवा आॅनलाईन पध्दतीने व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.यासंदर्भात दिपक किशोर गोलाणी या ३२ वर्षीय युवकाने चिखली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार १६ मे २०१९ रोजी फेसबुक या सोशल साईटवर त्यांना दुचाकी विक्रीस असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी पोस्टकर्त्यास गाडीची सविस्तर माहिती व मोबाईल क्रमांक मागितला असता ९४१३२०८३४६ हा नंबर दिला व आपले नाव विलास पटेल असल्याचे सांगितले. दरम्यान सदरची गाडी २६ हजार रूपयांमध्ये घेण्याचा सौदा आपसात ठरविण्यात आला. गाडीची डिलीव्हरी घेण्यासाठी त्यांनी आपले आधारकार्ड व फोटो सदर नंबरवर पाठवले. दरम्यान सदर नंबरवर गाडी मालकास त्याचे आयडीफ्रुफ मागीतले असता त्याने आधारकार्ड, आर्मी कँन्टीन स्मार्टकार्ड व इंडियन युनियन ड्राव्हींग लायसन्स व आर्मीच्या गणवेशातील आपला फोटो पाठविला. गाडीच्या ठरलेल्या २६ हजार रूपयांपैकी २० टक्के रक्क्म ५ हजार २०० ही कुमार गौरव यांचे खाते क्रमाक ९१७८९१८६३१५२ या नंबरवर जमा करण्यास सांगितले. त्यानुसार रक्कम सदर खात्यावर जमा केली. तेव्हापासून त्यांची फसवणुक होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर त्याने विविध कारणे सांगून व वेगवेगळी खाते क्रमांक देऊन पेटीएम व्दारे २० हजार ८००, ११ हजार १००, ११ हजार, १००, १५ हजार, ३००, १३ हजार व ९ हजार या प्रमाणे एकूण ८५ हजार ५०० रूपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोलाणी यांनी ३ जून रोजी पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी विकास पटेल रा.इंदौर, मध्यपदेश याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनामध्ये चिखली पोलीस करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)