लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शाळा सुरू झाल्यानंतरही आरटीई अंतर्गत शेकडो विद्यार्थी मोफत प्रवेशापासून वंचित होते. तेव्हा शाळेच्या पहिल्याच दिवशी २७ जून रोजी ‘मोफत प्रवेशापासून विद्यार्थी वंचित’ यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, या वृत्ताची दखल घेऊन जिल्ह्यात मोफत प्रवेशासाठी ड्रॉ काढून मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार ४७९ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळाला असून, तिसऱ्या ड्रॉमधील ६७ विद्यार्थ्यांचे प्रवेश १४ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम २००९ राज्यामध्ये अंमलात आला तेव्हापासून राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये पहिल्या वर्गात २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, अमरावती विभागामध्ये शाळा सुरू झाल्यानंतरही ही प्रक्रिया थंड बस्त्यात होती. त्यामुळे २७ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी ३ हजार ३५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी होते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातीलही शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश होता. जिल्ह्यात मोफत प्रवेशासाठी असलेल्या १९८ शाळांमध्ये २ हजार ७७३ जागा आहेत. मोफत प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी २ हजार १६१ अर्ज आले होते. त्यासाठी ड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पहिला ड्रॉ १ हजार ५६१ विद्यार्थ्यांचा काढण्यात आला. त्यातील १२८९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. तसेच इतर १२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत व १०६ विद्यार्थी विविध कारणामुळे अपात्र ठरले. त्यानंतर दुसरा ड्रॉ २३६ विद्यार्थ्यांचा काढण्यात आला. यामध्ये १६८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर ५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही व १५ विद्यार्थी अपात्र ठरले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान शाळा सुरू होऊनही मोफत प्रवेशाची प्रक्र्रिया कासव गतीनेच सुरू होती. तेंव्हा यासंंदर्भात ‘लोकमत’ने २७ जून रोजी ‘मोफत प्रवेशापासून विद्यार्थी वंचित’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. दरम्यान, जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडून या वृत्ताची दखल घेऊन मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यात आला. १४ जुलैपर्यंत ही मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यानंतर उर्वरित जागा चौथ्या ड्रॉमधून भरण्यात येणार आहेत. १७७ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशाकडे पाठ२५ टक्के मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यात पहिल्या ड्रॉमध्ये १२३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर १२१ विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या ड्रॉमध्ये १६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला व ५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. तिसऱ्या ड्रॉमध्ये २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला व ३ विद्यार्थी शाळेपर्यंत गेलेच नाही. जिल्ह्यातील असे एकूण १७७ विद्यार्थ्यांनी आर.टी.ई.च्या मोफत प्रवेशातून प्रवेश घेतला नाही.
मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा!
By admin | Published: July 14, 2017 12:48 AM