- सुधीर चेके पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही वडिलांनी मोलमजुरी करून त्यांना शिक्षण दिले. त्यांनीही वडिलांचा विश्वास सार्थ ठरवित अर्थशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून प्राध्यापक पदारूपाने यश मिळविले. मात्र, शिक्षणासाठी त्यांना उपसावे लागलेले कष्ट इतरांच्या वाट्याला येऊ नयेत, या उदात्त हेतूने त्यांनी प्रामुख्याने बहुजन समाजातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्व: खर्चातून मोफत अभ्यासिका सुरू केली. शिक्षणाचा बाजार मांडलेल्या गर्दीत, विजय वाकोडे हे प्राध्यापक त्यामुळेच दीपस्तंभ ठरले आहेत.सध्या स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी अभ्यास हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, यासाठी गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना अनेकदा इच्छा असूनही जागेअभावी अभ्यास करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी स्थानिक एसपीएम महाविद्यालयात कार्यरत प्रा. विजय वाकोडे गेल्या साडेतीन वर्षांपासून विनामूल्य अभ्यासिका चालवित आहेत. शेलूद येथे प्रा. विजय पुंडलीक वाकोडे यांनी हा उपक्रम चालविला. स्थानिक एसपीएम महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. प्रा. वाकोडे यांनी हालाखीच्या परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व आणि गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधांची जाणिव बाळगून ते राहत असलेल्या स्वत: च्या निवास्थानाच्या वरच्या मजल्यावर १८ बाय २२ फुटांचा एक प्रशस्त हॉल बांधून अभ्यासिका निर्माण केली. ही अभ्यासिका बहुजन समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य खुली करून दिली आहे. त्यांचे वडिल पुंडलीक वाकोडे यांनी लोकांच्या शेतात मजुरी करून त्यांना शिकविले. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे धड पुस्तकेही मिळत नव्हती. अशा अनंत अडचणींवर मात करून आपण संघर्षातून शिकलो असल्याने बहुजन समाजातील कोणत्याही मुलावर अशी वेळ येवू नये, अथवा अंगी गुणवत्ता असूनही केवळ परिस्थितीमुळे कोणत्याही बहुजन विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये, या उदात्त हेतूने प्रा. वाकोडे यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. या अभ्यासिकेसाठी आवश्यक स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे विविध पुस्तके व इतर सुविधा देखील त्यांनी मोफतपणे उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय विविध तज्ञांचे मार्गदर्शन शिबीरे देखील ते घेत असतात. दरम्यान, या अभ्यासिकेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आजरोजी सुमारे १५ विद्यार्थी येथे नियमिपणे अभ्यास करतात. प्रसिध्दी अथवा कोणत्याही स्वार्थाशिवाय त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू असून साडेतीन वर्षांपासून त्यांनी चालविलेल्या या उपक्रमामुळे १६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी ज्योती वाकोडे यांचा मोठा वाटा आहे. प्रा. वाकोडे यांनी चालविलेला हा उपक्रम प्रेरणादायी असून बहुजन विद्यार्थ्यांना दिलासा देणारा आहे.
२०१५ पासून सुरू आहे उपक्रमस्व. प्रा. सिरसाठ यांच्या संकल्पनेतून २०१५ मध्ये प्रा. विजय वाकोडे, ही. रा. गवई, तलावारे, प्रदीप जाधव, सोनटक्के या प्राध्यापक व शिक्षक मंडळींनी समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासीका उपलब्ध करून देण्याचा चंग बांधला होता. त्यानुषंगाने बहुजन समाज विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अभ्यासिका प्रत्यक्षात सुरू झाली. मात्र, जागेची अडचण आल्याने ही अभ्यासिका प्रा. वाकोडे यांनी आपल्या स्वत: च्या जागेत स्थलांतरीत करून स्व:खर्चाने चालविली आहे. स्थलांतरपश्चात अभ्यासिकेचा संपूर्ण भार प्रा. वाकोडे यांच्यावर आहे. या अभ्यासिकेमुळे राज्यसेवा परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारणारे अनिल भगवान चव्हाण यांची त्यांना मदत लाभत आहे.अभ्यासिकेतील १६ विद्यार्थ्यांना यशप्रा. वाकोडे यांच्या या अभ्यासिकेत अभ्यास करून आतापर्यंत १६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. यामध्ये दीपक रायलकर, गणेश गिरी, गणेश खेडेकर, अनुराधा सोळंकी, अमोल राऊत, शिवा हिवाळे यांच्यासह इतर १६ विद्यार्थी आज शासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत आहेत.