खामगाव: लोकसभा निवडणुकीत वृध्द, दिव्यांग आणि गरोदर तसेच स्तनदा मातांना मतदानासाठी मोपॐत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. निवडणूक विभागाच्या विनंतीला मान देत खामगाव शहरातील ऑटो युनियनच्यावतीने ऑटो आणि तत्सम वाहने पुरविण्यासाठी नि:शुल्क सेवा देण्याचे मान्य केले. त्यानुसार ऑटो युनियनला शहरातील २८ लोकेशनची यादी देण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी खामगांव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी ५-बुलढाणा लोकसभा मतदारसंघ, खामगांव यांचे अध्यक्षतेखाली व तहसीलदार अतुल पाटोळे, खामगांव, नायब तहसीलदार नितीन पाठक, तथा पथक क्रमांक ११ वाहन व्यवस्थापन नोडल अधिकारी, तसेच स्टेनो अनिल खिराडे,यांचे उपस्थितीत महात्मा गांधी सभागृह तहसील कार्यालय, खामगांव येथे बैठक पार पडली. यावेळी टॅक्सी युनियन चे अध्यक्ष निलेश देवताळू व संजय अवताडे उपस्थितीत होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता ०५- बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधील खामगांव विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान केंद्रावर ८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक वरील तसेच दिव्यांग मतदार, गरोदर व स्तनदा माता, यांना ऑटोद्वारे मतदानाकरिता ने-आण करण्याकरिता बैठक घेण्यात आली. यात खामगाव शहर ऑटो युनियनच्या वतीने नि:शुल्क वाहने देण्याची तयारी दर्शविल्याचे निवडणूक विभागाकडून स्पष्ट केले आहे. काही ठिकाणी दोन ऑटो जास्त मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी किमान दोन ऑटोची व्यवस्था व ज्या ठिकाणी फक्त एकच केंद्र आहे त्या त्या ठिकाणी एक ऑटोची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे खामगाव शहर ऑटो युनियनच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.