लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मधल्या काळात कांद्याचे उतरलेल्या भावामुळे शेतकर्यांना मातीमोल भावात विकाव्या लागलेल्या कांद्याचे अनुदान शेतकर्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील दुसर्या टप्प्यातील २७ लाख चार हजार ६५४ रुपयांचे अनुदान शेतकर्यांना लवकरच मिळणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव १४ एप्रिल रोजी पुणे येथील पणन संचालकांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने मलकापूर आणि नांदुरा या दोन बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक होत असते. मोठ्या प्रमाणावर या दोन बाजारपेठेतच कांदा येत असतो. मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान बाजारात कांद्याचे भाव अचानक पडले होते. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून शेतकर्यांनी उगवलेला कांदा हा त्यांना मातीमोल भावात विकावा लागला होता. काही शेतकर्यांनी तर बाजर समितीमध्ये नेण्यात येणारा कांदा भाव मिळत नसल्याने त्रस्त होऊन तसाच रस्त्याच्या कडेला बेवारस फेकून दिला होता तर काही शेतकर्यांनी मिळेल त्या किंमतीत तो विकला होता. दरम्यान कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकर्यांमध्ये शासनाप्रती तीव्र असा रोष निर्माण झाला होता.अनपेक्षीत पडलेले कांद्याचे भाव पाहता शेतकर्यांना काही प्रमाणात त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य शासनाने प्रति क्विंटल २०० रुपया प्रमाणे २०० क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भाने शेतकर्यांकडून अनुषंगीक अर्जाचीही मागणी केली होती. परिणामी पहिल्या टप्प्यात एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत शेतकर्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या कालावधीत जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा बाजार समितीकडे ३५९ शेतकर्यांनी अर्ज केले होते. त्यांना २० लाख ६३ हजार ९८४ रुपयांचे प्रति क्विंटलला २०० रुपये प्रमाणे २०० क्विंटल मर्यादेत पैसे मिळाले असून ते संबंधीत शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याचे बाजार समितीशी संबंधित असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्याउपरही अनेक शेतकर्यांचे अर्ज बाजार समित्यांना मिळाले नव्हेत. त्यामुळे मुदत वाढवून देण्याची ओरड होत होती. त्याची दखल घेत नंतर राज्य शासनाने १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत शेतकर्यांकडून अर्ज मागवले होते. अशा शेतकर्यांनाही आता अनुदान मिळणार असून त्यासंदर्भातील प्रस्ताव १४ मे रोजीच पुणे येथील पणन संचालनालयाला पाठविण्यात आला आहे. येत्या आठवड्यात हे अनुदान शेतकर्यांना मिळण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टप्प्यातील अनुदान लवकरचयामध्ये १३ हजार ५२३ क्विंटल कांद्यापोटी हे २७ लाख रुपयांचे अनुदान शेतकर्यांना मिळणार आहे. यामध्ये मलकापूर बाजार समितीअंतर्गत ३७२ शेतकर्यांना ११ हजार ९३५ क्विंटल कांद्यापोटी २७ लाख चार हजार ६५४ रुपये अनुदान देण्यासंदर्भातील प्रस्तावाचा यात समावेश आहे. तत मलकापूर बाजार समिती अंतर्गत ३१४ शेतकर्यांना ११ हजार ९३५.७७ क्विंटल कांद्यापोटी २३ लाख ८७ हजार १५४ रुपये तर नांदुरा बाजार समितीअंतर्गत ५८ शेतकर्यांना एक हजार ५८७.५० क्विंटल कांद्यापोटी तीन लाख १७ हजार ५०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.