लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आंबिया बहाराकरिता हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये आंबा या फळ पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. आंबा या फळ पिकाला नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजे १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण लागू राहणार आहे. त्यासाठी अवेळी पाऊस, जास्त तापमान, कमी तापमान किंवा गारपीट या हवामान धोक्यापासून नुकसान झाल्यास शेतकºयांना एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये प्रति हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. फळांचा राजा असलेला आंबा आता शेताच्या बांधावर कमी प्रमाणात दिसत आहे. बांधावरील आंब्याचे प्रमाण कमी झाल्याने वेगवेगळ्या जातीच्या आंब्याच्या फळबागा घेण्याकडे शेतकरी वळले आहेत. या आंब्याच्या फळबागांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने कृषी विभागाकडून प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०१७-१८ लागू करण्यात आली आहे. कमी-जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकºयांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी सदर विमा योजना लागू करण्यात आली आहे. आंबा या फळ पिकासाठी १ जानेवारी २०१८ पासून विमा संरक्षण राहणार आहे. १ जानेवारी २०१८ ते ३१ मे २०१८ या कालावधीत अवेळी पावसाने नुकसान झाल्यास ३० हजार रुपये नुकसान भरापाई देय राहणार आहे. १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत जास्त तापमानामुळे नुकसान झाल्यास २७ हजार ५०० रुपये, १ एप्रिल ते ३१ मे २०१८ या कालावधीत नुकसान झाल्यास १६ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई देय राहणार आहे. १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान कमी तापमानामुळे नुकसान झाल्यास ३३ हजार रुपये व १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत गारपीटमुळे नुकसान झाल्यास ३६ हजार ७०० रुपये विमा संरक्षीत रक्कम देण्यात येईल. अशाप्रकारे एकुण विमा संरक्षीत रक्कम १ लाख ४६ हजार ७०० रुपये देय राहणार आहे.
प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदतबँकेकडून अधिसुचित फळ पिकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या व बिगर कर्जदार शेतकºयांचा आंबा या फळ पिकाचा विमा प्रस्ताव ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच आंबा या फळ पिकासाठी बँकानी कर्जदार शेतकºयांची घोषणा पत्र संबंधीत विमा कंपनीस १८ जानेवारी पर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
आंबा फळासाठी तीन तालुकेच समाविष्टफळांचा राजा असलेल्या आंबा या महत्वाच्या फळ पीकाला विमा देण्यासाठी पश्चिम वºहाडातील केवळ तीन तालुक्यांचाच समावेश करण्यात आला आहे. सन २०१७-१८ मध्ये आंबिया बहाराकरीता पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्याकरिता अधिसूचित जिल्ह्यांमध्ये पश्चिम वºहाडातून बुलडाणा व वाशिम हे दोन जिल्हे आंबा या फळ पीकामध्ये समाविष्ट आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे महसूल मंडळ समाविष्ट करण्यात आले आहे. तर वाशिम जिल्ह्यातून वशिम तालुक्यातील केकत उमरा व राजगाव आणि मानोरा तालुक्यातील मानोरा हे महसूल मंडळ समाविष्ट आहे.