- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाच्यावतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येतो; मात्र जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण हक्काची पायमल्ली होत आहे. जिल्हा परिषद शाळा सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस उरलेले असताना आतापर्यंत एकाही शाळेकडे गणवेशाचा निधी पोहचला नाही. त्यामुळे मागील दोन वर्षाप्रमाणेच यंदाही जिल्ह्यात गणवेशाचा गोंधळ कायम असल्याने मुलांना पहिल्याच दिवशी जुन्या गणवेशावर शाळेत जावे लागणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांना गणवेश देण्याचा नियम असतानाही जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशाविनाच शाळेत यावे लागते. शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांच्या गणवेशासाठी लागणार निधी देण्यात येतो. हा निधी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्षांचे असलेल्या संयुक्त बँक खात्यात जिल्हा परिषद पाठविते. त्यानंतर शाळा व्यवस्थापण समितीने या निधीतून गणवेश खरेदी करून शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना द्यायला हवा. सदर गणवेश परिधान करून विद्यार्थी शाळेत पहिल्या दिवशी येईल, अशी शासनाची संकल्पना आहे. मात्र या संकल्पनेला जिल्ह्यात हरताळ फासण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षापासून एकदाही शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच नाही. २६ जून रोजी जिल्हा परिषद शाळा सुरू होत आहेत. परंतू आतापर्यंत शिक्षण विभागाकडून शाळेला निधी देण्यात आला नाही. त्यामुळे यंदाही पहिल्या दिवशी मुलांना मोफत गणवेशापासून वंचीत राहावे लागणार आहे. शालेय गणवेश निधी वाटपात काही बदल करण्यात आलेला आहे. आठ ते दहा दिवसात गणेशाचा निधी वाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळतील. - डॉ. श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी, बुलडाणा.