ओमप्रकाश देवकर। लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा (बुलडाणा): जिल्हय़ात गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेची कामे धडाक्यात सुरू आहेत. कामाचा दर्जाही तुलनेने चांगला आहे; मात्र ज्या यंत्रणेंतर्गत ही कामे पूर्ण करण्यात आली त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हय़ात झालेल्या कामांची ४६ कोटी ९0 लाख रुपयांची देयके थकीत झाली आहे. परिणामी जलयुक्तच्या चालू वर्षातील कामांना ब्रेक लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.वास्तविक थर्ड पार्टी असेसमेंटद्वारे जिल्हय़ातील जलयुक्तची कामे व त्यांची गुणवत्ता मध्यंतरी तपासण्यात आली होती. त्यांचा दर्जा ही चांगला होता. टँकरग्रस्त बुलडाणा जिल्हा टंचाईपासून मुक्त होण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची आहे. गेल्या तीन वर्षाच्या काळात या योजनेचा शेतकर्यांना चांगला लाभ झाला आहे; मात्र बुलडाणा जिल्हय़ात झालेल्या कामांची देयके रखडल्याने समस्या निर्माण झाली आहे. आता उन्हाळ्य़ाच्या तोंडावर चालू वर्षासाठीच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामाची गती वाढविण्याची गरज आहे; मात्र नेमक्या याच काळात हा निधी थकलेला असल्याने अडचण येत आहे.दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने राज्यात भाजपा सरकारने महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना आणली होती. मुख्यमंत्री, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या योजनेत विशेष लक्ष घालून कामे प्रभावीपणे होतील, याची काळजी घेतली. त्यामुळे अभियानाला गती आली होती. या योजनेंतर्गत जिल्हय़ातील जवळपास १७ यंत्रणांतर्गत कामे होत आहेत. यामध्ये कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभाग, राज्य सिंचन विभाग, वन विभाग तसेच शासनाच्या इतर विभागाकडूनही कामे होत आहे. जिल्हय़ातील जलयुक्त शिवार योजनेच्या २0१५-१६ आणि २0१६-१७ या आर्थिक वर्षामधील जलसंधारणाची कामे कंत्राटदारांनी पूर्ण केली आहे; पण देयकेच मिळालेली नाही. त्यामुळे जिल्हय़ातील ही कामे चालू आर्थिक वर्षात प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामध्ये २0१५-१६ या वर्षातील २८ कोटी ५५ हजार आणि २0१६-१७ या वर्षाची १८ कोटी ३५ हजार असे मिळून ४६ कोटी ९0 हजार रुपयांची देयके थकली आहेत.
जलयुक्त शिवार अभियानातून जी कृषी विभागाची कामे करण्यात आलेली आहेत, त्या कामांची देयके अदा करण्यासाठी निधीची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यानुषंगाने पाठपुरावा सुरू आहे.- गणेश भागवत गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर
आमच्यासह इतरही कंत्राटदारांनी शासनाचे काम असल्याने लाखो रुपये या कामात गुंतविले. व्यवसाय म्हटला की, बँकेच्या व्याजाचे पैसेसुद्धा या कामात गुंतविले. बँकांचेही हप्ते थकले. - निखिल क्षीरसागर, मार्डी, जि. सोलापूर