-ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजने अंतर्गत जिल्ह्यात सध्या पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून ब वर्गात मोडणाºया रस्त्यांच्या माती कामाला सुरूवातही झाली आहे. तहसिल स्तरावरून अनेक प्रस्तावित कामांना मान्यता देणे व इतर प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. परंतू पाणंद रस्ते विकासासाठी दिलेला जनसुविधेचा निधी हा जनसुविधेसाठीच दिला जाणार आसल्याने पाणंद रस्त्यांसाठी निधीचा दुष्काळ निर्माण होत असल्याचे दिसून येते. शेतरस्ते हा शेतीचा आत्मा आहे. जिल्ह्यात शेतरस्त्यांसाठी लोकसहभागातून अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार विविध योजनांच्या अभिसरणातून पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतरस्ता कामाचे अ, ब आणि क असे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहेत. त्यात कच्चा रस्ता मजबुतीकरण करणे, पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे आणि अतिक्रमण मुक्त रस्ता कच्चा किंवा पक्का रस्ता एकत्रीकरण करणे अशा तीन प्रकारात ही कामे करण्यात येतात. कच्चा रस्ता मजबुतीकरणासाठी प्रती किलोमीटर तीन लाख ९७ हजार ३५४ रुपये, पाच किमी वहन अंतरासाठी चार लाख ७९ हजार रुपये प्रतिकिलोमीटर आणि दहा किमी वहन अंतरासाठी पाच लाख ७३ हजार ७८१ रुपये प्रमाणे खर्च अपेक्षित आहे. रस्त्याच्या माती कामासाठी साधारणत: ५० हजार रुपये खर्च प्रतिकिलोमीटर अपेक्षित आहे. पाणंद रस्त्यांसाठी दीड कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे. दरम्यान, पाणंद रस्ते विकासासाठी दिलेला जनसुविधेचा निधी हा जनसुविधेसाठी दिला जाणार आसल्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी मागील आठवड्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये स्पष्ट केले होते. त्यामुळे पाणंद रस्त्याच्या कामासाठी पुन्हा निधीची कमतरता निर्माण होण्याची शक्यता दिसून येते. सुरूवातीला पाणंद रस्त्यासाठी निधी कमी असताना आता पुन्हा हा निधी जनसुविधेसाठी जाणार असल्याने रस्त्याच्या कामाचा प्रश्न निर्माण होत आहे.
बुलडाणा तालुक्यात तीन ठिकाणे कामे सुरूबुलडाणा तालुक्यात चांडोळ, नांद्रा कोळी व दहीद शिवारात तहसिलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये माती कामांचा समावेश असून त्यासाठी ५० हजार रुपये प्रतिकिलोमीटर खर्च अपेक्षित आहे. तर उर्वरीत प्रस्तावित कामांनाही १५ दिवसात सुरूवात होणार आहे.
कच्च्या रस्त्यांना मजबुतीकरणाची प्रतीक्षाअनेक कच्च्या रस्त्यांना मजबुतीकरणाची प्रतीक्षा लागली आहे. गतवर्षी काही ठिकाणी मुरूम टाकण्यात आला होता, मात्र निधीअभावी रस्त्याचे काम थंडबस्त्यात पडल्याचे उदाहण जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून येतात. अशाच बहुप्रतीक्षीत असलेल्या बुलडाणा तालुक्यातील रायपूर ते वाघापूर या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.
पाणंद रस्त्यांच्या प्रस्तावित कामांचा सर्व अहवाल तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात आजच मान्यता प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. - राजेश पारनाईक, उपविभागीय अधिकारी, मेहकर.
.बुलडाणा तालुक्यात तीन ठिकाणी पाणंद रस्त्यांचे कामे सुरू झाली आहेत. इतर प्रस्तावित कामेही लवकरच सुरू होणार आहेत. इंग्रजकालीन व तहसिलदारांनी अतिक्रमण मुक्त केलेले पाणंद रस्त्यांचा प्राधान्याने विकास करण्यात येत आहे. - सुरेश बगळे,तहसिलदार, बुलडाणा.