मेहकर: मेहकर व लोणार येथील पोलिसांना निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी लवकरच निधी मिळणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे. १७ जूनला मुंबई येथे मेहकर मतदार संघातील मेहकर, लोणार, डोणगाव, जानेफळ येथील पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने व कार्यालय बांधकामासंदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात बैठक संपन्न झाली.
बैठकीला खा. प्रतापराव जाधव, आ. तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत, माजी आ. शशिकांत खेडेकर हजर होते. बैठकीत देसाई यांनी सांगितले की, राज्यातून पोलीस कर्मचारी निवासस्थान व कार्यालय बांधकामासाठी ३०० प्रस्ताव आले होते. पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरावरील निवासस्थानांकरिता निधी मंजुरात सुरू आहे. लवकरच पहिला टप्पा संपून दुसऱ्या टप्प्यात मेहकर व लोणारचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांनी मंत्र्यांना सांगितले की, मेहकर हे आता नागपूर-मुंबई महामार्गावरील मुख्य शहर आहे तर लोणार हे जागतिक कीर्तीच्या सरोवरासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा दोन्ही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी लवकर निधी मंजूर करण्यात यावा. यावर गृहमंत्र्यांनी आश्वासन दिले की, दुसऱ्या टप्प्यात मेहकर व लोणारचा समावेश असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील. तिसऱ्या टप्प्यात डोणगाव व जानेफळ येथे कर्मचारी निवासस्थाने होतील, असे बैठकीत ठरल्याचे स्वीय सहायक रूपेश गणात्रा यांनी कळवले आहे.
देऊळगाव मही येथे पोलीस स्टेशनची मागणी
देऊळगावराजा पोलीस स्टेशनचे विभाजन करून देऊळगावमही येथे पोलीस स्टेशन सुरू करावे व निवासस्थाने, कार्यालय बांधण्यात यावे. बीबी, संग्रामपूर, मोताळा येथे कर्मचारी निवासस्थाने व कार्यालय बांधकामासाठी सुद्धा निधी मंजूर करावा, अशी मागणी यावेळी खा. प्रतापराव जाधव यांनी केली़ या मागणीबाबतसुद्धा गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी होकार दिला आहे.