पाईपलाईनसाठी विना परवाना रस्त्याचे खोदकाम
बुलडाणा : शहरात अनेक ठिकाणी नवीन रस्त्यांची कामे झालेली आहेत. परंतु हे नवीन रस्ते पाईपलाईनासाठी काही नागरिकांकडून खोदण्यात आलेले आहेत. पाईपलाईनसाठी विना परवाना रस्त्याचे खोदकाम केले जात असल्याचे दिसून येते.
वीटभट्टी व्यवसाय संकटात
मोताळा : कोरोना विषाणू संसर्गामुळे वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. या व्यवसायाला उभारी म्हणून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी वीट उत्पादकांकडून होत आहे. गेल्या काही महिने अनेक ठिकाणी बांधकामे बंद होती, आता पावसामुळे पुन्हा वीटभट्ट्या बंद आहेत.
नायब तहसीलदारांना पदोन्नतीची प्रतीक्षा
बुलडाणा : तहसीलमधील पात्र कर्मचाऱ्यांना सेवेत लागून ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदार या पदाची वेतन घेत आहेत. परंतु कामकाज अव्वल कारकुनाची करावे लागत आहे. जिल्ह्यातही नायब तहसीलदार संवर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. ती पदोन्नतीने भरल्यास शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.
रमाई आवास योजनेत निधीचा अडसर
लोणार : तालुक्यातील लाभार्थ्यांच्या रमाई आवास योजनेचा निधी गत काही वर्षांपासून मिळाला नाही. परिणामी, लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अजूनही अधुरे आहे. दरम्यान, शासन, प्रशासनाने लक्ष देऊन निधी तत्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.