बुलडाणा/ जऊळका : सिंदखेडराजा तालुक्यातील जऊळका सरपंचाविरुद्ध ४ ऑगस्टला सहा विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव पारित झाला हाेता़ या ठरावावर आता २ सप्टेंबर राेजी हाेणाऱ्या ग्रामसभेत मतदान घेण्यात येणार आहे़
जऊळका ग्रामपंचायतीच्या सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्या विरुद्ध उपसरपंच नामदेव बुधवंत यांच्यासह ८ सदस्यांनी ३० जुलैला अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर तहसीलदार सुनील सावंत यांनी ४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेतली़ यामध्ये गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले़ त्यामध्ये सरपंच द्वारकाबाई सांगळे यांनी गुप्त मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानुसार तहसीलदार सुनील सावंत यांनी गुप्त मतदान घेतले. सर्वांसमक्ष मतमोजणी करण्यात आली असता, अविश्वास ठरावाच्या बाजूने ६ सदस्यांनी मतदान केले तर दोन मते विरुद्ध पडली. त्यानुसार सरपंच द्वारकाबाई सांगळे यांच्याविरुद्ध ठराव पारित झाल्याचे तहसीलदार यांनी जाहीर केले हाेते़ थेट जनतेतून सांगळे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे, या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी २ सप्टेंबर राेजी जिल्हा परिषद शाळेत ग्रामसभा आयाेजित करण्यात आली आहे़
सर्वांना बजावल्या नाेटीस
सिंदखेडराजा तहसीलदारांनी जऊळका ग्रामपंचायतींच्या सरंपच, सचिव व संबंधितांना नाेटीस बजावली आहे़ २ सप्टेंबर राेजी जिल्हा परिषद शाळेत ही ग्रामसभा घेण्यात येणार आहे़ काेराेनाविषयक नियमांचे पालन करून ही ग्रामसभा घेण्याचे आदेश सिंदखेडराजाचे तहसीलदार सावंत यांनी दिले आहेत़