- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कशेगाव (जि. बुलडाणा): कोरोना विषाणू निर्बंधामुळे सलग दुसºयावर्षी विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांचा प्रकटदिन महोत्सव साध्या पध्दतीने बुधवारी साजरा करण्यात आला. श्रींच्या १४४ व्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने बुधवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी ११ वाजता मंदिरात महाआरती झाली. कोविड आपत्ती व्यवस्थापन नियमांचे काटेकोरपणे पालन करीत संत नगरीत श्री गजाननाचा जयघोष करण्यात आला. श्रींच्या मंदिरात तसेच प्रकटस्थळी हजारो भाविकांनी अतिशय शिस्तीत श्रींचे दर्शन घेतले.कोरोनामुळे शासनाने कडक निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत प्रकट दिनानिमित्त निघणारी श्रींच्या रजतमुखवट्याची नगरपरिक्रमा रद्द करण्यात आली. तरीही श्रींच्या दर्शनासाठी बुधवारी पहाटेपासूनच दर्शनाचा अखंड ओघ सुरू होता. दिंडीनेही अनेक भाविक आसपासच्या परिसरात शेगावात दाखल झाले. पहाटेपासूनच भाविकांची श्रींच्या दर्शनासाठी लगबग दिसून आली. तर हजारो भाविकांनी ई-पासद्वारे दर्शन घेऊन श्रींच्या चरणी श्रध्देचा अभिषेक केला. ई-पास न मिळालेल्या भाविकांनी प्रकट स्थळाचे दर्शन घेत श्रींचरणी कृतज्ञता अर्पण केली. तर हजारो भाविक श्रींच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नतमस्तक होताना दिसून आले.
चौकट...प्रकट स्थळावरही भाविकांची रिघ- श्री गजानन महाराजांच्या १४४ व्या प्रकटदिनानिमित्त शेगावातील प्रकटस्थळी भाविकांची दर्शनासाठी रिघ दिसून आली. कोरोना नियमांचे शिस्तीत पालन करीत प्रकट स्थळाचेही हजारो भाविकांनी बुधवारी पहाटेपासूनच दर्शन घेतले.