- नानासाहेब कांडलकर
जळगाव (जामोद) : श्री संत गजानन महाराजांचा १४४ वा प्रगटदिन बुधवार दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात व देश-विदेशात साजरा होत आहे. या वर्षीच्या प्रकटदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे "श्रीं"च्या प्रकटदिनाची तारीख व तिथी ही एकाच दिवशी आली आहे.अभ्यासकांच्या मते असा हा योगायोग काही वर्षांनंतर जुळून आला आहे. ज्या दिवशी श्री गजानन महाराज प्रकट झाले.तो दिवस शनिवार होता.यावेळी तिथी व तारीख एक असली तरी दिवस मात्र बुधवार आहे.माघ वद्य सप्तमी शके १८०० दिनांक २३ फेब्रुवारी १८७८ रोजी श्री गजानन महाराज प्रकट झाले.काही वर्षानंतर यावर्षी तिथी व तारीख एकच आली आहे. त्यामुळे या प्रकटदिनाला भक्तांकडून विशेष महत्त्व दिले जात आहे.कोविड-19 चा प्रादुर्भाव नसता तर विदर्भपंढरी संतनगरीसह महाराष्ट्रात व देश-विदेशात श्रींचा हा प्रगट दिन निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर साजरा झाला असता.परंतु कोविडचे नियम पाळत श्रींच्या भक्तांकडून प्रकटदिनाची तयारी ठिकठिकाणी सुरू झाली आहे.
"श्रीं"च्या प्रकट होण्याचा प्रसंग या पृथ्वीतलावर परमेश्वराने जगाच्या उद्धारासाठी अनेक असे अवतार घेवून भक्तांचा उद्धार केला. त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज यांनी प्रत्यक्ष जगाच्या उद्धारासाठी प्रकट होवून अवतार कार्य केले.ते शेगावी वटवृक्षाखाली माध्यान्ह वेळी ऐन तारूण्याअवस्थेत एकदम प्रगट झाले.त्यावेळी ते तीस बत्तीस वर्षाचे असावे असा अंदाज आहे.उष्ट्या पत्रावळीतील भातशेते निजलीलेने वेचून खात असताना बंकटलाल व दामोदर पंत यांना श्री गजानन महाराज दिसले.तो दिवस होता माघ वद्य सप्तमी.हाच दिवस "श्रीं" चा प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो.या वर्षी "श्रीं" चा १४४ वा प्रकट दिन आहे.
प्रकट दिनाच्या सप्ताहास प्रारंभश्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराज संस्थानसह श्रींच्या मंदिरामध्ये माघ वद्य प्रतिपदा ते माघ वद्य सप्तमी असे सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.होम-हवन,कीर्तन,प्रवचन,भजन,काकडा, हरिपाठ,"श्रीं"च्या विजय ग्रंथाचे पारायण अशा अध्यात्मिक कार्यक्रमांनी हा सप्ताह साजरा केला जातो.या वर्षी तिथी व तारीख एक आल्याने श्रींच्या भक्तांचा उत्साह हा मोठा राहणार आहे.गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी पासून या सप्ताहाला सुरुवात होत आहे.बुधवार दिनांक २३ फेब्रुवारीला श्रींच्या प्रगटदिनानंतर हा सप्ताह संपेल.