बुलडाणा : विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर संस्थानही लॉकडाउनच्या काळात जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या संस्थानने जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ‘कम्यूनिटी किचन’ सुरु केले असून, मंदिराच्यावतीने शहरात दररोज २००० भोजन पाकिटांचे वितरण करण्यात येत आहेत. सकाळी १००० व सायंकाळी १००० असे दोन वेळा एकून दोन हजार भोजन पाकिटे शेगावातील निवारागृहे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पुरविण्यात येत आहेत. तसेच शहरात अडकून पडलेले मजुर, सामाजिक संस्थांनी शोधून काढलेली गरजु कुटुंबांनाही घरपोच भोजन पाकिटे देण्यात येत आहे.शेगावचे गजानन महाराज मंदिर संस्थान वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनात संस्थांच्या वतीने वर्षभर विविध सेवाकार्य सुरूच असतात मात्र नैसर्गिक आपत्तीच्या काळातही शेगाव संस्थान हे मदतीसाठी सर्वात पुढे आहे. सध्या बुलढाणा शहरांमध्ये कोरोनाचे पाच पॉझिटिव्ह रुग्ण यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा हा सील करण्यात आला आहे. तर बुलढाणा शहर हे हाय रिस्क झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत तीत गरीब मजूर अडकलेले प्रवासी बेघर भटके अनाथ यांच्यासाठी भोजन देण्याकरता जिल्हा प्रशासनाने श्री संत गजानन महाराज संस्थांना विनंती केली होती. त्यानुसार शेगाव संस्थांनी कम्युनिटी किचन सुरू केली असून दोन एप्रिल पासून २००० लोकांसाठी बकेट स्वरूपामध्ये भोजन प्रसाद वितरीत केल्या जात आहे. प्रशासनाच्यावतीने समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे काम पाहत आहेत बुलढाण्यात तसेच बुलढाणा शहराच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या नाथजोगी सारख्या भटक्या समाजालाही लाभ होत आहे.
गजानन महाराज मंदिराने सुरु केले कम्यूनिटी किचन; दररोज २००० भोजन पाकिटांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 2:14 PM
दोन हजार भोजन पाकिटे शेगावातील निवारागृहे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पुरविण्यात येत आहेत.
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ‘कम्यूनिटी किचन’ सुरु केले.गरजु कुटुंबांनाही घरपोच भोजन पाकिटे देण्यात येत आहे.