शेगाव : विकास आराखड्यांतर्गत शेगाव येथील गजानन महाराज मंदिर परिसराला लागून असलेल्या मातंगपुरी या लोकवस्तीचे पुनर्वसन शासन स्तरावर सध्या सुरू आहे. यामध्ये बहुतांश रहिवासी यापूर्वीच पुनर्वसित झालेले आहेत. मात्र काही व्यावसायिक आणि काही कुटुंब स्थलांतरित न झाल्याने बुधवारी शेगाव नगर परिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने एक गेस्ट हाऊस आणि चार घरे पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलीस, महसूल व न.प. स्तरावरील अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.शेगाव येथील श्री ग.म.संस्थानला लागून असलेल्या मातंगपुरी या लोकवस्तीतील काही व्यावसायिक आणि राहत असलेल्या कुटुंबीयांनी स्थलांतरणास नकार देऊन जागेचा ताबा सोडलेला नव्हता. तर स्थलांतरणाची कारवाई थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. यामध्ये मंगळवारी न्यायालयाने याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी २९ व्यावसायिकांसह काही कुटुंबीयांना स्थगनादेश दिला आहे. मात्र, न्यायालयात स्थगनादेश न मिळालेल्या पाच घरांवर आज बुधवारी नगर परिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गजराज चालविला. यामध्ये भारत गेस्ट हाऊससह रवींद्र महादेव सिरसाट, शे.लाल शे.मिर, शब्बीर खान अयुब खान आणि अकिल खान अय्युब खान यांची घरे गजराजाच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आली. न.प.चे उपमुख्याधिकारी डी.आर.शिंदे यांच्यासह कर्मचारी व पोलीस पथकाची उपस्थिती होती.
गेस्ट हाऊससह चार घरांवर पुन्हा चालला गजराज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2017 12:36 AM