- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. 18 - तीन दिवस चालणा-या महालक्ष्मीच्या उत्सवामध्ये सजावटीला मोठे महत्स असते. परंतु यावर्षी जीएसटीमुळे महालक्ष्मीच्या मुखवट्यांसह विविध वस्तुंवर १२ ते १८ टक्क्याने दरवाढ झाली आहे. महालक्ष्मीच्या या सजावटीला जीएसटीची झळाळी मिळाली असून दरवाढीनंतरही हौसेपुढे किंमतीला मोल नसल्याचे चित्र बाजारातील वाढत्या गर्दीमुळे दिसत आहे. गणेश स्थापनेनंतर चार दिवसाने म्हणजे २९ ऑगस्ट रोजी महालक्ष्मीची स्थापना करण्यात येणार आहे. महालक्ष्मीच्या या उत्सवामध्ये महालक्ष्मीचा श्रृंगार व इतर सजावट सर्वांचे लक्ष वेधत असते. त्यामुळे सजावट व साज श्रृंगाराला महिलांकडून मोठे महत्व दिल्या जाते. परंतु यावर्षी जीएसटी लागल्यामुळे मुखवट्यांसह विविध वस्तुच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामध्ये त्यामध्ये महालक्ष्मीच्या मुखवट्यांच्या किंमतीत कमीतकमी १० टक्के वाढ झाली असून मुखवट्यांचे दर यंदा ५५१ रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यत आहेत. तर महालक्ष्मीच्या ओढणीसाठी १२.५ टक्के दरवाढ झाली आहे. दागदागिन्यांच्या किंमती १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच कोठ्या, मखर सुद्धा १८ टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. दागदागिन्यांमध्ये कंबरपट्टा, मेखला, हार, चपलाहार, मुकुट व विविध प्रकार १५० पासून ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. कोठ्या ५०० पासून १५०० रुपयांपर्यंत उंची आणि आकारानुसार उपलब्ध आहेत. बाळांचे कपडे ३०० ते ५००, महालक्ष्मींचे हात २५० ते ४०० व लोखंडी स्टँटवरील महालक्ष्मीसाठी २ हजार ९०० रुपये मोजावे लागत आहेत. या वाढत्या दराचा हौसेपुढे कुठलाही परिणाम झाला नसल्याचे बाजारातील वाढत्या गर्दीवरून दिसून येत आहे. बाजारात महालक्ष्मी साहित्याची खरेदीसाठी गर्दी वाढतच आहे.
बाजारात चैतन्याचे वातावरण...सण उत्सवावर यावर्षी दुष्काळाचे सावट दिसून येत होते. परंतु गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावणे सुरू केले आहे. पाच ते सहा दिवसांत झालेल्या पावसाने बाजारातील आर्थिक उलाढालही वाढविली आहे. महालक्ष्मी उत्सवाचे सहित्य खरेदीसाठी सुद्धा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.