लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा बुलडाणा जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही सार्वजनिक ठिकाणी, चौकात किंवा रस्त्याच्या कडेला गणेशाची स्थापना होणार नाही, असे पोलिस प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, धार्मिक आस्था आणि श्रद्धां जपत चार भिंतीच्या आतच हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे.दुसरीकडे सण, उत्सव हे आरोग्योत्सव साजरा करण्याचे आवाहनच जिल्हा प्रशासनाने यापूर्वी केले आहे. सोबतच गणेश मंडळांनी त्यांची ऊर्जा, शक्ती, पैसा हा सकारात्मक बाबींवर खर्च करावा असे स्पष्ट केले आहे. सोबतच सण उत्सव आरोग्योत्सव म्हणून साजरे करण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळातही रक्तदान, प्लाझमा दान, कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी जनजागृती आणि कोरोना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी ‘मिशन पॉसिबील’ला सहकार्य करणे या चतुसुत्रीवर आधारीत सण, उत्सव साजरे करण्याची भूमिका प्रशासनाची असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.दरवर्षी बुलडाणा जिल्ह्यात ९७३ ठिकाणी मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यंदा या गणेश मंडळांना परवानगी देण्यात आलेली नाही. जी गणेश मंडळे प्रशासनास सहकार्य करणार आहेत त्यांना पुढील वर्षी गणेशोत्सवात परवानगी देतांना कुठलीही बाधा निर्माण होणार नाही, याची ग्वाहीही पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आली. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीने एक प्रशस्तीपत्रही देण्यात येवून त्यांची पुढील वर्षाची गणेशोत्सवाची परवानगी अबाधीत ठेवण्यात येईल.
सार्वजनिक ठिकाणी उत्सव नाहीयंदा आऊट डोअर ऐवजी इनडोअर अर्थाच चार भिंतीच्या आत गणेशोत्सव साजरा करण्यास हरकत नाही. आरतीसाठी तीन, चार किंवा पाच पेक्षा अधीक व्यक्ती उपस्थित राहणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. आलटून पालटून वेगवेगळ््या व्यक्ती उपरोक्त मर्यादेत आरती करू शकतात. आऊट डोअर ऐवजी इंडोअरमध्ये म्हणजेच मंदीर, तालीम, मंडळात, मोठ्या जागेत मात्र चार भिंतीच्या आत गणेशोत्सवास परवानगी राहील, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मिरवणूका नाहीतघरगुतीस्तरावरील गणेशोत्सव साजरा होत असला तरी गणेशोत्सवाची आगमण तथा विसर्जन मिरवणूक निघणार नाही. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने नदी, तलाव व विहीरीत गणेशाचे विसर्जन यंदा होणार नाही. त्या ऐवजी घरातच बादली, पिंपामध्ये गणरायाचे विसर्जन करण्याचा निर्णय झालेला आहे.