बुलढाणा - देशभरात आज गणेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि सर्वसामान्यांनीही यंदा सोशल मीडियातून गणेशोत्सवाचा आनंद शेअर केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातही गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतोय. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची निर्बंध होते या निर्बंधात गणेश भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाला मनोभावे पुजता आलं नाही. मात्र, यंदा बाप्पांच्या आगमनाची धूम दिसून येत आहे.
कोरोनामुळे गतवर्षी देखील सार्वजनिकरित्या हा गणेश उत्सव साजरा करता आला नाही. यंदा कुठल्याही प्रकारचे कोरोना नियम नसल्याने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटा साजरा करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील मानाच्या लाकडी गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या दीडशे वर्षापासूनची ही परंपरा या ठिकाणी जोपासल्या जात आहे. खामगाव शहरातील सराफा भागात लाकडी गणपतीची स्थापना करण्यात आली. अय्याजी लोक या ठिकाणी राहायचे आणि त्यांनी या भरीव अशा लाकडी मूर्तीची दीडशे वर्षांपूर्वी या ठिकाणी स्थापना केली. तेव्हापासूनच हे गणेश मंदिर मोठ्या दिमाखात उभं आहे. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये या लाकडी गणपती बाप्पाचा सहभाग झाल्याशिवाय इतर कुठलेही गणेश मंडळ त्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत नाही. विसर्जन मिरवणुकीत पहिल्या क्रमांकावर या मानाच्या लाकडी गणपतीला स्थान दिलं जातं.