चिखली : शहरातील पुंडलिक नगरमधील एका महिलेवर दोन आरोपींनी जबरदस्तीने सामुहिक बलात्कार करीत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील राऊतवाडी परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित महिलेने बुधवारी पोलिसात नोंदवली. त्यानंतर लगोलग चक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या १२ तासात आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरोधात महिलेवर बलात्कार करून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील पीडित महिला ३२ वर्षांची असून ती स्थानिक पुंडलिक नगरमध्ये वास्तव्यास आहे. मंगळवारी २५ जून रोजी सायंकाळी ही महिला आपल्या मुलीसमवेत राऊतवाडी परिसरातील एका नातेवाईक महिलेकडे भेटीसाठी गेली होती. दरम्यान तेथेच ती मुक्कामी थांबली होती. नातेवाईक महिलेच्या घरी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील दत्ता नवघरे (रा. पांग्रा-पांग्री, ता. मालेगाव) व विजय शिंदे ( रा.वसारी ता.मालेगाव) हे दोघे एका काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने पोहोचले. पीडित महिलेच्या नातेवाईक महिलने त्यांची पीडितेशी ओळख करून दिली. दरम्यान, सर्वांनी जेवण केल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी दोघे जण बेडरूममध्ये झोपले तर पीडितेची नातेवाईक महिला घरातील मुलांसमवेत हॉलमध्ये झोपली आणि पीडित महिला किचनमधील कामे आटोपून तेथेच झोपली होती. दरम्यान रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास आरोपींनी पीडित महिलेच तोंड दाबून तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती अत्याचार केला.
सोबतच पीडितेसोबत अनैसिर्गक कृत्य देखील केले. दरम्यान, या प्रकाराने हादरलेल्या महिलेने आरडाओरड करीत नातेवाईक महिलेला या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. अनैसर्गिक कृत्यामुळे पीडितेलाही त्रास होत होता. त्यामुळे तातडीने नातेवाईक महिलेने रुग्णवाहिका बोलावून पीडित महिलेस स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी नातेवाईक महिलेसह दोन्ही आरोपीही सोबत होते. मात्र, पीडितेस रुग्णालयात भरती करताच आरोपींनी तेथून पळ काढला. दरम्यानच्या काळात पीडितेकडील भ्रमणध्वनीही नातेवाईक महिलेने हिसकावून घेतला होता.
या घटना क्रमानंतर दुसऱ्या दिवशी २६ जून रोजी पीडित महिलेने चिखली पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभिर्य पाहता ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रविण सोनुने, पोलिस हेडकॉन्स्टेबल नारायण तायडे, प्रकाश पाटील, नायक पोलिस कॉन्स्टेबल शरद गिरी, उमेश शेगोकार, सदानंद चाफले, पोलिस कॉन्स्टेबल गजानन जाधव यांनी तपासचक्रे वेगात फिरविली आणि अवघ्या १२ तासांत आरोपी विजय शिंदे व दत्ता नवघरे यांना वाशिम येथून अटक केली. याप्रकरणात अत्याचार व अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभिर्य पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)