डोणगांव : ग्रामपंचायतच्या कारभाराची चाैकशी करून दाेषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे़ या तक्रारीनंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ‘माझी वसुंधरा’ या समाजमाध्यमावर पाेस्ट करून गावातील कचरा संकलन करणाऱ्या गाड्या बंद करण्यात येणार असल्याचे म्हटले हाेते़ गुरुवारी गावात एकही गाडी न आल्याने त्या बंद केल्याची चर्चा गावात सुरू हाेती़
ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य हसनशेरखाँ महंमद खाँ व शेख आयूब शेख गुलाब मुल्लाजी यांनी २१ जूनला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांच्याकडे केली हाेती़ याविषयी वृत्त प्रकाशित हाेताच सचिव ज्ञानेश्वर चनखोरे यांनी ‘माझी वसुंधरा’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत मी ग्रामविकास अधिकारी कठोर निर्णय घेत आहे़ उद्यापासून गावात घंटागाडी कचरा नेण्यासाठी येणार नाही़ जोपर्यंत तक्रारकर्ते माफी मागत नाही तोपर्यंत घंटा गाडी सुरू होणार नाही, अशी पाेस्ट केली़ तक्रार केल्यामुळेच घंटागाड्या बंद केल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे़
डोणगांव येथील घंटागाडी ही स्वच्छतेसाठी असून तक्रार केली म्हणून संपूर्ण गावाला घंटागाडी बंद करून वेठीस धरणे योग्य नाही़ ग्रामविकास अधिकारी यांना काम करायचे नसेल तर राजीनामा द्यावा.
हमिद कुरेशी. नागरिक, डोणगांव
गावातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आवश्यक आहे व ग्रामविकास अधिकारी यांचा घंटागाडी खरेदी करण्याचा निर्णय योग्य आहे; परंतु असे तक्रारीवरून घंटागाडी बंद करणे योग्य नाही.
- भगवानराव बाजड, ग्रामपंचायत सदस्य, डोणगांव
ग्रामविकास अधिकारी यांना मिळालेल्या अधिकाराचा त्यांनी सुडबुद्धीने उपयोग करू नये व तो होत असल्यास वरिष्ठांनी त्यांना समज देऊन घंटागाडी सुरू करावी़
- चरण आखाडे ग्रामपंचायत सदस्य, डोणगांव झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने घंटागाड्या बंद करणे म्हणजे जनतेला वेठीस धरणे होय़ गावातील घंटागाड्या तत्काळ चालू करण्यात याव्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल़
अमोल धोटे, स्वाभिमानी शेतकरी संघटना