लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील कोवीड केअर सेंटरमधील कचरा आणि पीपीई किट सदृश्य वस्तू सहा एप्रिल रोजी रस्त्याच्या कडेलाच जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे बुलडाणा-धाड मार्गालगच हा कचरा जाळण्यात आला आहे. बुलडाणा येथील विशेष कोवीड हॉस्पीटल अर्थात स्त्री रुग्णालयात प्रारंभी हे कोवीड केअर सेंटर होते. मात्र कोवीड हॉस्पीटलमधील काही अत्यावश्यक कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावयाची असल्याने येथील कोवीड केअर सेंटर हे लगतच्यात अंध विद्यालयामध्ये ३० एप्रिल दरम्यान हलविण्यात आले आहे. त्यामुळे येथे क्वारंटीन असलेले संदिग्ध रुग्ण ठेवण्यात येतात. अशा या कोवीड केअर सेंटरमधील कथितस्तरावरील बायोमेडीकल कचरा, पीपीई कीट सदृश्य कचरा सहा एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तेथे कार्यरत असलेल्या दोघांनी रस्त्याच्या कडेला जाळला. या कचºयामध्ये वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत वस्तू व पीपीई कीट सारखी दिसणारी वस्तू होती. त्यामुळे अशा प्रकारे वैद्यकीय कचºयाची रस्त्याच्या कडेला लावण्यात येणारी ही विल्हेवाट धोकादायक म्हणावी लागेल. एकीकडे केंद्रीय वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २८ मार्च २०१६ रोजी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम लागू केलेला आहे. त्या कायद्यानुसार जैव वैद्यकीय कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेची असते. मात्र बुलडाण्यातील या कोवीड केअर सेंटरमधील हा कचरा चक्क रस्त्याच्या कडेला जाळण्यात आला आहे. त्यामुळे प्रसंगी अशा प्रकारातून नागरिकांमध्ये धास्ती निर्माण होण्याची भीती आहे. या बाबीकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्याशी संपर्क साधला बायोमेडीकल वेस्टची नियमानुसार तथा मार्गदर्शक सुचनानुसार विल्हेवाट लावण्यात येते, असे सांगण्यात आले. दरम्यान, बुलडाणा येथील या कोवीड केअर सेंटरमधील घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना विचारणा केली असता याबाबत आपण माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले. दरम्यान, नियमानुसार शास्त्रोक्त पद्धतीने या कचºयाची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, अन्यथा प्रसंगी धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बुलडाणा शहरात कोवीड सेंटरमधील कचरा रस्त्यावर जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 7:06 PM