सध्या पावसाळ्याचे दिवस असून त्यात शहरातील विविध भागांमध्ये घाण कचरा साचला आहे. त्यामुळे नागरिकांना मलेरिया, डेंग्यू, टायफाॅईडसह इतर आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शहरांमध्ये डासांचे प्रमाण वाढत असल्यामुळे शहरात धूर फवारणी करण्याची गरज निर्माण झाली आह, तर काही ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग जमले आहेत. अनेक वस्तीमध्ये तर घंटागाडी फिरत नसल्यामुळे अस्वच्छता वाढली आहे.
घनकचरा प्रकल्प ठरतोय शोभेचा
नगर परिषदेने कोट्यवधी रुपये खर्च करून ओला कचरा व सुका कचरा प्रक्रियाचा घनकचरा प्रकल्प उभा केला; परंतु शहरांमध्ये कचरा गाड्या येत नसल्यामुळे हा प्रकल्प शोभेची वस्तू म्हणून उभा आहे. शहरातील स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एम. आय. एम.चे तालुकाध्यक्ष शेख मुस्तफा यांनी आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक अशोक निचंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कामचुकार ठेकेदारावर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने शहरांमध्ये कचरा उचलण्यासाठी घंटागाडी फिरत आहेत. शहरात स्वच्छता अभियान नियमित राबवण्यात येते.
अशोक निचंग, आरोग्य निरीक्षक, लोणार नगर परिषद.