नायगाव दत्तापूर येथे गावाच्या मध्यवर्ती भागात विश्वास श्यामराव दुतोंडे यांचे घर आहे. ११ मे रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातील गॅसची गळती होऊन घराला आग लागली. बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाणीपुरवठा योजना सुरू करत आग विझविण्याचा प्रयत्न केला, सोबतच मेहकर येथील अग्निशमन दलालाही कल्पाना दिली. मात्र तोवर विश्वास दुतोंडे यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये घरामध्ये एक वर्षासाठी साठवून ठेवलेेले धान्य, जीवनावश्यक वस्तू, कागदपत्रे, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू जळून गेल्या. दुतोंडे यांचे जवळपास दोन लाख ७ हजार ५०० रुपयाचे नुकसान झाले.
एकीकडे लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. त्यातच ही आपत्ती दुतोंडे कुटुंबावर आल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी एल. जी. खिल्लारे, जानेफळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल बुंदे, बीट जमादार कैलास चतरकर, इर्शाद पठाण, ग्रामसेवक वाय. जी. बचाटे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान या कुटुंबाला शासनस्तरावरून मदत द्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. तहसीलदारांकेडही याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे.