चिखली : स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा या महाविद्यालयास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद (एमजीएनसीआरई), उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पियन' पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याहस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महाविद्यालयातर्फे राबविलेले विविध उपक्रम प्रशंसनीय असून, या समाजोयोगी कार्याची दखल जिल्हास्तरावरच नाही, तर राष्ट्रीय पातळीवरसुद्धा घेण्यात आली आहे. त्यामुळे या कार्याची प्रशस्ती म्हणून हा पुरस्कार या महाविद्यालयाला देण्यात येत आहे. मागील दोन दशकांपासून या महाविद्यालयाने ग्रामीण भागात राबविलेले समाजोपयोगी उपक्रम स्तुत्य व वाखाणण्याजोगे असून, यापुढे ही परंपरा महाविद्यालयाने कायम ठेवावी, अशी अपेक्षा यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी व्यक्त केली. प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच वृक्षारोपण, जलसंवर्धन, स्वच्छता या बाबींवर विशेष भर दिला आहे. यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे. प्रा. डॉ. प्रशांत महल्ले यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांना उपक्रमांची माहिती दिली. यापूर्वी या महाविद्यालयाला २०१३ ला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाला असून, २०१६ मध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने पर्यावरण पुरस्कार देऊन गौरव केला आहे, हे विशेष. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, एमजीएनसीआरईच्या प्रतिनिधी जयश्री, डॉ. महेश चोपडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे उपस्थित होते.