चिखली : साखरखेर्डा येथील स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद (एमजीएनसीआरई), उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'वन डिस्ट्रिक्ट वन ग्रीन चॅम्पियन' पुरस्कार जाहीर झाला आहे.
एमजीएनसीआरई, स्वच्छता कृती योजनेचा एक भाग म्हणून दरवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे संपूर्ण भारतभर उच्च शिक्षण आणि सेवा पुरविणाऱ्या संस्थांचे सर्वेक्षण केले जाते. या पुरस्कारासाठी देशभरातून आयआयटीपासून ते ग्रामीण भागातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज सादर केले होते. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एका उत्कृष्ट महाविद्यालयाला हा पुरस्कार दिला जाणार होता. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यातून स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त करून देशभरात बुलडाणा जिल्ह्याचे आणि अमरावती विद्यापीठाचे नाव उंचाविले आहे. एमजीएनसीआरईद्वारे दरवर्षी विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्याद्वारे कॅम्पस जलशक्ती (स्वच्छ जल संवर्धन) मधील स्वच्छता आदी विषयक ज्ञान वितरणाचे कार्य होते. सोबतच कॅम्पस-पोस्ट कोविड-१९ स्वच्छता योजना राबविण्यास प्रोत्साहन देते. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात स्वच्छता कृती योजना (एसएपी) समिती स्थापन करून स्वच्छता उपक्रम राबविले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे यांचे शिस्तबद्ध प्रशासन आणि नियोजनबद्ध कार्यप्रणाली व त्याला सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याची जोड यामुळे अपल्पावधीतच ग्रामीण भागातील या महाविद्यालयाने अनेक खडतर आव्हानांचा व अडचणींचा सामना करीत प्रगती केली आहे. त्याची प्रशस्ती म्हणून महाविद्यालयाला २०१२ ला महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मिळाला असून, २०१६ मध्ये महाविद्यालयाचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे हे विशेष.