- नीलेश जोशी
बुलडाणा ब्रिटीश काळात जिल्हानिहाय गॅझेटियर निर्माण केल्या गेले होते. तीच परंपरा सध्या कायम असून संदर्भ व न्याय मुल्य असल्याने जिल्हा गॅझेटियर हे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. त्यामुळे जिल्हा गॅझेटियर निर्मिती करताना योग्य पद्धतीने सर्व्हेक्षण करून गॅझेटियरला आकार दिल्या जात असतो, अशी माहिती गॅझेटियर (दर्शनिका) विभागाचे सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी बुलडाणा येथे दिली. बुलडाणा जिल्ह्याचे मराठी भाषेतील गॅझेटियर १४ जानेवारी रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते प्रकाशीत झाले. १८०० पृष्ठांचे दोन खंडात हे गॅझेटियर आहे. त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ते बुलडाणा येथे आले होते. त्यावेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता उपरोक्त माहिती त्यांनी दिली. ब्रिटीश काळात महाराष्ट्रात २६ जिल्हे होते. आता महाराष्ट्रात ३६ जिल्हे झाले आहेत. नव्याने झालेल्या जिल्ह्यांचेही गॅझेटियरवर काम होत असून सध्याचे अधुनिक तंत्रज्ञान व टेक्नोसेव्ही युवा पिढी पाहता लवकरच गॅझेटियर विभाग प्रायोगिक तत्वावर मोबाईल अॅप्लीकेशन उपलब्ध करणार आहे. राज्य शासनाच्या वेबसाईटवर जवळपास ४० हजार पृष्ठे मोफत उपलब्ध करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
प्रश्न : नवनिर्मित जिल्ह्यांच्या गॅझेटियरवर काम सुरू आहे का?
महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्माण झालेल्या जिल्ह्यांच्या गॅझेटियरवर सध्या काम सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्याचे गॅझेटियर प्रकाशीत झाल्यानंतर आता अल्पावधीतच वाशिम, सिंधूदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या गॅझेटियरचे काम पूर्णत्वास जात आहे. लवकरच ते प्रकाशीत होणार आहे. एका जिल्ह्याचे गॅझेटियर बनविण्यास साधारणत: साडेतीन वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे दर्शनिका विभागाकडून एकाच वेळी तीन ते चार जिल्ह्यांच्या गॅझेटियरवर प्रामुख्याने काम करण्यात येत आहे.
प्रश्न : गॅझेटियरमध्ये नेमके काय असते?
- जिल्हा गॅझेटियर बनवितांना सुक्ष्मस्तरावर माहिती संकलीत केल्या जाते. एका जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये साधारणत: १२ प्रकरणे असतात. त्यात ऐतिहासिक, प्रशासकीय, भौगोलिक, विकास, आर्थिक स्थिती, दळणवळण असे विषय घेऊन ही १२ प्रकरणे हाताळण्यात येतात. यामध्ये विविध संदर्भ व उल्लेख आलेले असल्याने गुगल तथा विकीपीडियाचा कुठलाही आधार घेतला जात नाही. प्रत्यक्ष सर्व्हे तथा माहितीची खातरजमा करूनच गॅझेटियर प्रकाशीत केल्या जात असते. दर्शनिका विभागातंर्गत गॅझेटियर बनविणार्या संपादक मंडळामध्ये एकूण १३ सदस्य असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी भूषण गगराणी हे संपादक मंडळाचे अध्यक्ष आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे ते प्रधान सचिव आहेत.
प्रश्न : ग्रामनिर्देशिका किती महत्त्वाची ?
गॅझेटियरमध्ये ग्राम निर्देशिका दिलेली आहे. छोट्या गावांचीसुद्धा त्यात नोंद घेतलेली असते. लातूर भुकंपाच्यावेळी जिल्हा गॅझेटियरच्या आधारावर जिल्ह्यातील गावांची पाहणी केल्याने प्रत्यक्षात जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा अंदाज घेऊन मदत उपलब्ध करणे शक्य झाले होते. त्यामुळे ग्रामनिर्देशिका हा यातील एक महत्त्वाचा भाग आहे.
प्रश्न : काळानुरूप दर्शनिका विभागात काय बदल होताहेत ?
काळानुरूप गॅझेटियर अर्थात दर्शनिका विभागातही बदल होत असून गॅझेटियर विभागाचे प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल अॅप्लीकेशन लॉन्च करण्यात येत आहे. यामध्ये विविध दहा मालिकेत प्रकाशीत करण्यात आलेली पुस्तके मोबाईलवर उपलब्ध करण्यात येणार आहेत. गॅझेटियर विभागातर्फ आतापर्यंत प्रकाशीत करण्यात आलेल्या पुस्तकांपैकी जवळपास ८३ ई-बुक आवृत्ती उपलब्ध करून देण्यात आल्या असून शासनाच्या वेबसाईटवर जवळपास ४० हजार पेक्षा अधिक पृष्ठ मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. इंग्रजी भाषेसोबतच प्रादेशिक भाषेतून हे खंड उपलब्ध करण्यात येत आहेत.
प्रश्न. : राज्य गॅझेटियर आणि गड किल्ल्यांबाबत काय धोरण आहे?
- दर्शनिका विभागातर्फे ऐतिहासिक, भौगोलिक माहिती देणारे गॅझेटियर प्रकाशीत करण्यात आलेले आहेत. अलिकडील काळात यात्रा उत्सवाची माहिती असणारे विभागवार गॅझेटियर प्रकाशीत करण्यात येत असून विदर्भातील माहिती असलेले यात्रा उत्सवावरील पुस्तक नुकतेच काढण्यात आले आहे. आगामी काळात गड व किल्ल्यांची संपूर्ण माहिती असणारे पुस्तक काढण्यात येणार असून कोकण विभागातील गड व किल्ल्यांची माहिती असणारा पहिला खंड ही पूर्णत्वास गेला आहे. या व्यतिरिक्त कृषी प्रधान भारतामधील महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रावरही आधारीत खंड काढण्यात येत आहे. यामध्ये तांदळाच्या साडेसहा हजार जातींसह, जैवविविधतेला अनुसरून अनेक बाबींचा उहापोह राहणार आहे. नाने घाट परिसरात सातवाहन काळात डांगी बैल वापरण्यात येत होते. तेथे अन्य जातीचा बैल फारकाळ तग धरू शकत नाही. असे संदर्भ व रोचक माहितीही यात उपलब्ध होणार आहे.