खावटी अनुदानापासून लाभार्थी वंचित
बुलडाणा : आदिवासी विकास विभाग यांनी काढलेल्या ९ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयान्वये अतिमागास जमाती व पारधी परित्यक्ता, विधवा, कामगार, नरेगा मजूर वर्ग यांना खावटी अनुदान प्रति कुटुंब चार हजार रुपये व दोन हजार रुपये रक्कम तात्काळ देण्याची मागणी भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गजानन सोळंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जिजामाता साखर कारखाना सुरू करण्याची मागणी
दुसरबीड : येथे असलेला जिजामाता साखर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी कामधेनू आहे. शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याकडे लक्ष द्यावे. त्यांना सहकाराचा फार मोठा अनुभव असल्यामुळे त्यांनी हा कारखाना तात्काळ सुरू करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वामनराव जाधव यांनी केली आहे.
रुईखेड टेकाळे येथे पाच जणांचा मृत्यू
बुलडाणा : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील रुईखेड टेकाळे येथे कोरोना या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. मागील पंधरा दिवसांत या आजाराने पाच जंणाचे बळी घेतले आहेत. मागील वर्षभरापासून कोरोनाने सर्वत्र कहर केला आहे. गावागावात मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे. दिवसागणिक जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे.
साखरखेर्डा परिसरात काेराेनाचा उद्रेक
साखरखेर्डा : परिसरात असलेल्या गावांमधील व्यक्तींच्या गेल्या पाच दिवसांत केलेल्या कोरोना चाचण्यांपैकी १२८ व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. त्यामुळे साखरखेर्डा परिसर हॉटस्पॉट ठरत आहे. याचवेळी संचारबंदी असतानाही ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा शिरकाव होत असल्याने नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.
नियमांचे उल्लंघन : दाेन लाखांचा दंड
मेहकर : नागरिक कोरोनाचे नियम न पाळता बिनधास्त वावरत असल्याने त्यांच्या विरोधात स्थानिक पोलीस व पालिका प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करणे सुरू केले आहे. १४ ते ३० एप्रिल या पंधरा दिवसांत पोलीस व पालिका प्रशासनाने दोन लाख दहा हजारांचा दंड वसूल केला आहे. एवढेच नव्हे, तर नियम तोडून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली.
सर्क्युलर रोडचे काम पूर्ण करा
बुलडाणा : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सर्क्युलर रोडचे काम गत काही दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
अधिकाऱ्यावर शिस्तभंगाचे आदेश
बुलडाणा : तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश विभागीय उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वन्य प्राण्यांची पाण्याकरिता भटकंती
दुसरबीड : उष्णतेची लाट आली असून, उष्णतेमुळे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत वन्य प्राण्यांना जंगलामध्ये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे हे वन्यजीव पाण्याचा शोध घेत रानोमाळ भटकत असून, पाण्याचा शोध मात्र लागत नाही, उलट विहिरीमध्ये पडून, त्याचप्रमाणे रोडवरून जाताना अपघात होऊन अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे़