चिखली : तालुक्यात कोरोना व्हायरसने ‘ब्रेक के बाद’ पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. शहरासह तालुक्यात बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबत तहसील कार्यालयात आ. श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांची बैठक पार पडली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भाने २० फेब्रुवारी रोजी ही तातडीची बैठक झाली. यामध्ये आ. श्वेता महाले यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीला पं. स. सभापती सिंधु तायडे, उपसभापती शमशादबी पटेल, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त, भाजप शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, कुणाल बोंद्रे, तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, ठाणेदार गुलाबराव वाघ, आरोग्य अधिकारी डॉ. खान, पं. स. सदस्या सुरेखा गवई, शिवराज पाटील, अतरोद्दीन काझी, रवी तोडकर, दीपक खरात, श्रीराम झोरे, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, गोपाल शेटे, राकेश चोपडा, मुन्ना बैरागी, जीवन बाहेती, अरुण भोलाने यांच्यासह अन्य उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय यांनी कुठल्याही कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होऊ देऊ नये, सर्व बँका, व्यापारी यांनी आपापल्या संस्थांमध्ये मास्क व सोशल डिस्टन्सिंगची सक्ती करावी, बँकेतील कर्मचारी व सर्व व्यापारी, तसेच जनतेच्या संपर्कातील नागरिकांनी दर पंधरा दिवसांनी तपासणी करून घ्यावी, बाजारपेठांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी पोलीस व नगरपरिषद यांची पथके नेमून शारीरिक अंतर राखण्यास प्रवृत्त करावे, मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करावा, पॉझिटिव्ह रुग्णास घरी ठेवू नये, खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी कोविड सदृश रुग्णांना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवावे, कोविड केअर सेंटरची क्षमता वाढविण्यात यावी यासह अन्य विषयांसदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले.