लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : शासनाच्या नाफेडसारख्या योजना शेतकर्यांच्या टाळुवरील लोणी खाण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी केले. वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजाराच्या प्रांगणात आयोजित कापूस- सोयाबीन परिषदेत ते बोलत होते.तुपकर म्हणाले की, शासनाने शेतकर्याच्या वाटेतील काटे काढले नसून, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासारख्या योजनेतून वाटेत काटे टाकले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शासनाने राजकारण करण्यासाठी एक प्रकारे वापर केला. देशातील कर्नाटक राज्यात सोयाबीनला जास्त भाव आहे; पण महाराष्ट्रात सोयाबीनला कमी भाव दिला जात असल्याने हा अन्याय नव्हे काय? नोटबंदी करून सरकारने देशातील जनतेला आर्थिक मंदीत टाकले. शेतकर्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नसून, आश्वासनाची खैरात वाटल्याचा प्रकार शासन करते, ही शोकांतिकाच नव्हे काय? शेतकर्यांना शेती पिकवूनही शेतमालाला योग्य भाव न देता त्याचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप करीत देशातील केंद्र व राज्य शासनावर टीका केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी रामदास भोपळे हे होते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, अमोल राऊत, स्वाभिमानी युवा आघाडीचे प्रशांत डिक्कर, विजय पोहनकर, बाळु डोसे यांची समयोचित भाषणे झालीत. व्यासपीठावर श्रीकृष्ण दातार, दामोधर इंगोले, नाना पाटील, मोहन पाटील, रोशन देशमुख, विलास तराळे आदींची उपस्थिती होती. संचालन करून आभार रामेश्वर गायकी यांनी मानले. शेतकरी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
नाफेडसारख्या योजना लुटण्यासाठी - तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:27 AM