लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: खोटे बोलून प्रसिद्धी मिळवणे हा माजी मंत्री सुबोध सावजी यांचा जुना धंदा असल्याचा टोला माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे यांनी रविवारी येथे लगावला.बोरी येथील विहिरीमध्ये जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी सावजींनी मध्यंतरी बैठा सत्याग्रह केला होता. २0 जानेवारी रोजी हे आंदोलन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आश्वासनानंतर स्थगित केले होते. दरम्यान, या सर्व पृष्ठभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे यांनी रविवारी मेहकर येथेल पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त आरोप केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, संचालक सुरेश काळे, सरपंच रामेश्वर बोरे, मेहकरचे उपनगराध्यक्ष जयचंद बाठिया उपस्थित होते. चनखोरे पुढे म्हणाले की, बोरी येथील नळ योजनेचे अंदाजपत्रक १ कोटी ९ लाख असून, २७ लाख ५४ हजारांचा पहिला हप्ता मिळाला आहे. संबंधित शेतकर्यांच्या दानपत्राची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अधिकार्यांच्या देखरेखीखाली विहिरीचे व जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. याच कामाचे मूल्यांकन ३४ लाख रुपये काढण्यात आले आहे. उर्वरित पैसा शासनाकडून मिळणे बाकी असताना १ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचा आरोप खोटा आहे. सुबोध सावजींनी पुरावे द्यावेत, असे प्रतिआव्हानही चनखोरेंनी दिले आहे.दरम्यान, चनखोरे यांनी, सावजी तब्बल १२ वर्षे आमदार व मंत्री होते. त्या काळात सावजींनी डोणगावचा पाणी प्रश्न सोडवला नाही. खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी डोणगाव पाणीपुरवठा योजनेसाठी ५ कोटी दिले. जे स्वत:च्या गावचा विकास करू शकले नाही ते जिल्हय़ाचा काय विकास करणार, असा खोचक प्रश्नही चनखोरेंनी उपस्थित केला.
माझे आंदोलन हे जनहितासाठी आहे. कोणत्याही खासदार, आमदार अथवा जिल्हा परिषद, पंचायत लोकप्रतिनिधीच्या विरोधात नाही. जे अधिकारी शासनाची दिशाभूल करून निकृष्ट व चुकीची कामे करून पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार करीत आहेत, त्यांच्या विरोधात माझे आंदोलन आहे.- सुबोध सावजी माजी राज्यमंत्री, मेहकर