अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा असलेल्या खामगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान, १६ पैकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध पार पडली असून, एका सरपंचासह ४८ ग्रामपंचायत सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या ना. भाऊसाहेब फुंडकर यांची होमपीच असलेल्या खामगाव मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची ‘ट्रायल’ म्हणून ग्रामपंचायतीवर दबदबा कायम ठेवण्यासाठी, भारतीय जनता पक्षासह प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षही सरसावला आहे. तथापि, कोंटी येथे भाजपने खाते उघडले असून, निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये काही ठिकाणी काट्याच्या लढती होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, तालुक्यातील दिवठाणा येथे ४ सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. तर खुटपुरी येथे ७, वडजी-0२, कवडगाव-0२, किन्ही महादेव-0३, जळका तेली-0२, नागापूर-0२, सजनपुरी-0२, माक्ता-0३, लोणी गुरव-0५, नायदेवी-0४, वझर-0२, झोडगा-0४ तर कोंटी येथील 0६ सदस्य पदाच्या जागाचा समावेश आहे. खामगाव तालुक्यात सरपंच पदाच्या १५ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत तर सदस्य पदाच्या १२६ जागांसाठी १५३ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत सरपंच पदासाठी ४३ उमेदवारांनी माघार घेतली असून, सदस्य पदाचय ४७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणुकीसाठी ५0 मतदान केंद्र सज्ज करण्यात आले असून, २२४ कर्मचारी अधिकार्यांचे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये ६ निवडणूक निर्णय अधिकारी, ६ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहा क्षेत्रीय अधिकार्यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या वाहतूक कामी ५ बसेस आणि १0 खासगी चारचाकी वाहने लावण्यात आली आहेत.
खामगाव तालुक्यात ४८ सदस्य अविरोध! खामगाव तालुक्यातील दिवठाणा, खुटपुरी, वडजी, कवडगांव, नांद्री, किन्ही महादेव, जळका तेली, नागापूर, सजनपुरी, माक्ता, लोणी गुरव, लोखंडा, नायदेवी, वझर, झोडगा, कोंटी येथे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी, कोंटी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक अविरोध पार पडली. तर ४८ ग्रामपंचायत सदस्य अविरोधत निवडून आले आहेत. या सदस्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक असून उर्वरित जागांवर निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने तयारी चालविली आहे. या निवडणुकीसाठी मतदान यंत्रे सील करण्यात आले.