बुलडाणा : पेन्शनचे बिल काढण्यास विलंब करणार्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या एका कर्मचार्यास संतप्त महिलेने चपलेने मारहाण केल्याची घटना आज २३ डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा परिषदेच्या आवारात घडली. गेल्या काही महिन्यांपासून एक महिला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात थकलेले पेन्शनचे बिल काढण्यासाठी शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवीत होती; परंतु संबंधित कर्मचारी गजानन वाकोडे हा हेतुपुरस्सर त्रास देत होता. दरम्यान, आज महिलेने शिक्षण विभाग गाठले असता पुन्हा गजानन वाकोडे त्याने उलट-सुलट उत्तरे दिली. त्याचे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या महिलेने चहा घेण्यासाठी त्याला कार्यालयाबाहेर काढले; तसेच जिल्हा परिषदेच्या आवारात येताच पायातील चप्पल काढून धुलाई करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्व कर्मचारी अचंबित झाले होते, यावेळी घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. विशेष म्हणजे सदर मारहाणीची घटना घडत असतानादेखील एकाही कर्मचार्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही. या मारहाण प्रकरणाची अद्याप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिली.
जि.प.कर्मचा-यास महिलेने दिला चोप
By admin | Published: December 24, 2014 12:20 AM