जानेफळ: शाळेतून परतत असताना मैत्रिणीसमोर युवकाने छेड काढल्याचा अपमान सहन न झाल्यामुळे एका अल्पवयीन मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मेहकर तालुक्याील वडाळी येथे गुरूवारी (ता. ३० जानेवारी) घडली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी युवकास अटक केली असून न्यायालयाने त्याची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.या प्रकरणी संतप्त जमावाने मृत मुलीचा मृतदेह मध्यरात्री जानेफळ पोलिस ठाण्यात नेल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरोधात दाखल केलेल्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील कलमात वाढ करत बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा आणि अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे संतप्त जमाव शांत झाला.वडाळी येथील एक अल्पवयीन मुलगी ही चिखली तालुक्यातील उंद्री येथील एका शाळेत दहाव्या वर्गात शिकत होती. दररोज गावावरून ती शाळेत बसद्वारे ये-जा करत होती. ३० जानेवारी रोजी सराव परीक्षा देण्यासाठी ती मुलगी गेली होती. परीक्षा दिल्यानंतर गावी परत येण्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास ती उंद्री बसस्थानकावर मैत्रिणीसह थांबली होती. त्यावेळी आरोपी महादेव सीताराम देवकर (२२, रा. वडाळी) याने तिला दुचाकीवर चल मी सोडून देतो असे म्हणत छेड काढली होती. ही बाब मैत्रिणीसमोर अपमान झाल्यासारखी वाटल्याने घरी पोहोचताच अल्पवयीन मुलीने तिच्या आजोबांना सांगितली. त्याचा जाब विचारण्यास तिचे आजोबा आरोपीकडे गेले असता अल्पवयीन मुलीने घरातच गळफास घेतला. आजोबा परत आले असता घराचा दरवाजा बंद दिसला व अल्पवयीन मुलीने कुठलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला असता अल्पवयीन मुलीने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांनी आरडाओरड केली असता शेजारील नागरिक मदतीला धावले होते आणि अल्पवयीन मुलीस उंद्री येथील रुग्णालय व तेथून चिखली येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविले असता तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तेथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वडाळी येथे नेण्यात आले. प्रकरणी पोलिसांनी प्रथमत: आरोपी महादेव सीताराम देवकर (२२) याच्या विरोधात अल्पवयीन मुली आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
मृतदेह ठेवला पोलिस ठाण्यातया घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शवविच्छेदन झालेले पार्थिवच पोलिस ठाण्यात नेत रोष व्यक्त केला. सोबतच प्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा व अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे ठाणेदार दिलीप मसराम यांनी वरिष्ठांशी चर्चा करून मृत मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेत या प्रकरणात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आणि अॅक्ट्रासिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर जमाव शांत झाला. रात्री उशिरा वडाळी येथे त्या मृत अल्पवयीन मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपीस अटकघटनेचे गांभिर्य पाहता पोलिसांनी महादेव सीताराम देवकर (२२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे. ३१ जानेवारी रोजी त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास मेहकरचे प्रभारी एसडीपीओ प्रदीप पाटील हे करीत आहेत.